
सामना प्रतिनिधी । खेड
लोटे औद्योगिक वसाहतीच्या जलप्रदूषणाचा मुद्दा गाजत असतानाच भोस्ते गावानजीकच्या जगबुडी नदीपात्रात मगर मृतावस्थेत आढळून आल्याने जलप्रदूषणावर शिकामोर्तब झाले आहे. दाभोळ खाडीतील प्रदुषीत पाणी भरतीच्या वेळी जगबुडीत येत असल्याने जगबुडीही प्रदुषीत झाल्याचा आरोप केला जात आहे.
लोटे औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी सोनपात्रा नदीमार्गे थेट दाभोळ खाडीत सोडले जात असल्याने दाभोळ खाडी प्रदुषीत झाली आहे. यामुळे दाभोळ खाडीत मोठ्या प्रमाणात मासे मरण्यच्या घटना घडत आहेत. गेल्या काही महिन्यात माशांबरोबर मगरीही मृत पावल्या आहेत. मृत पावलेल्या मगरी पाण्यामध्ये सडत असल्याने जलप्रदूषणामध्ये आणखीनच वाढ होत चालली आहे. सोनपात्रा मार्गे दाभोळ खाडीत होणाऱया जलप्रदूषणामुळे आजुबाजूचे सार्वजनिक पाणवठेही प्रदूषीत झाले आहेत.
खेड शहरानजीकच्या भोस्ते गावानजिक नदीपात्रात मृतावस्थेतील मगर आढळून आल्याने औद्योगिक वसहतीच्या सांडपाण्यामुळे होणारे जलप्रदूषण आता खेड शहरापर्यंत पोहचले आहे. या प्रदुषणाचा फटका अनेक गावांना बसणार आहे. प्रदूषीत झालेल्या दाभोळ खाडीमुळे जगबुडी नदी प्रदुषीत होणार असेल तर त्याचा फटका खेड तालुक्यातील खाडीपट्टा परिसरातील अनेक गावांना बसणार आहे. शिवाय खाडीलगत असलेल्या कोंडिवली, निळीक, अलसूरे, भोस्ते या गावांतील नैसर्गिक जलस्त्रोतही दूषीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शनिवारी दुपारी भोस्ते गावातील काही तरुणांना जगबुडी नदीपात्रात मगर मृतावस्थेत आढळून आली. खेड शहरामध्ये ही बातमी पसरताच अनेकांनी जगबुडी नदीकिनारी धाव घेतली. प्रदूषणाच्या दृष्टीने ही घटना गंभीर असल्याने तात्काळ याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत झालेली मगर ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर तीच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रदुषीत झालेल्या दाभोळ खाडीचे पाणी भरती दरम्यान जगबुडी खाडीत येत असल्याने जगबुडीही प्रदूषीत होण्याची शक्यता असली तरी खेड शहरासह आजुबाजुच्या ग्रामपंचायतींचे सांडपाणी जगबुडी नदीपात्रात सोडले जात असल्याने त्यामुळेही जगबुडी प्रदूषीत होण्याची शक्यता नाकाराता येत नाही. त्यामुळे जगबुडीत मोठ्य़ा प्रमाणात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर कशाप्रकारे प्रक्रिया करता येईल, याचाही विचार होणे आवश्यक आहे.



























































