
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सुमारे 700 शेतकऱयांचा मृत्यू झाला. देशातील निवडणुकांमध्ये शेतकऱयांचा रोष ओढवून न घेण्यासाठी, काहीही कारणे न देता शेतकरी विधेयक मागे घेण्यात आले. पण तरीही निवडणुकांमध्ये भाजपला याचा एकंदरीत परिणाम दिसून येईल, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा उपक्रम घोषित केला होता. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलामार्फत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी हा संवाद उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात सांगली जिह्यातल्या साखराळे गावातून झाली. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते.
केंद्राची शेतकरीविरोधी भूमिका
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. जाणूनबुजून रासायनिक खतांच्या किंमती वाढवत शेतकऱयांवर अन्याय केला जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱयांच्या अंगावर गाडय़ा घालण्यात आल्या. देशभर शेतकरी विरोधी भूमिका आपण सातत्याने अनुभवल्या आहेत, याची आठवणही जयंत पाटील यांनी यावेळी करून दिली.
विद्यार्थ्यांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेसाठी आंदोलन पुकारले होते. त्याचा उल्लेख करून जयंत पाटील म्हणाले की, मुलांची मने कलुषित करण्याचा प्रकार सुरू केला आहे. काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांना लिडर बनवत महाविकास आघाडी सरकार विरोधात कारस्थाने केली जात आहेत. मात्र मुलांच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करूनच निर्णय घेण्यात येईल.




























































