जिल्ह्यातील 2 लाख 66 हजार शेतकर्‍यांना 1 हजार 116 कोटींची कर्जमाफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crop-loan-4

सामना प्रतिनिधी । नगर

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून काल अखेर जिल्ह्यातील 2 लाख 66 लाख 672 शेतर्कयांच्यासाठी 1 हजार 116 कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली असून, त्यापैकी कर्जखाती 958 कोटी 83 लाख वर्ग करण्यात आले आहेत. एकरकमी परत फेड योजनेत दीड लाख रुपयांचे कर्ज माफ केले जात असून या योजनेसाठी येत्या 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

जिल्हा बँकेच्या 2 लाख 29 हजार 581 शेतर्कयांना 701 कोटी रुपये तर व्यापारी बँकांमधील 37 हजार शेतर्कयांना 414 कोटी रुपये माफ झालेले आहेत. कर्जमाफीची ऐकून ही 958कोटी 83 लाख रुपयांची रक्कम 2 लाख 66 हजार 642कर्जदार शेतर्कयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. डिसेंबर 2017 पासून राज्य सरकारने घोषणा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली. आतापर्यंत राज्य सरकारने दोन वेळेस कर्जमाफीचे अर्जभरण्यास मुदत दिलेली आहे. जिल्ह्यातील कर्जमाफीच्या तपशीलात आधार कार्ड आधारीत ऑनलाईन कर्जमाफीचा अर्ज अपलोड केलेल्या शेतकर्‍यांची संख्या 3 लाख 34 हजार 920 आहे..

सुरुवातीला कुटुंब हा घटक कर्जमाफीसाठी निकष धरण्यात आला होता.त्यानंतर 29 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार कर्जमाफी योजनेसाठी व्यक्ती हा निकष ठरविण्यात आला. त्यामुळे कुटुंबास दीड लाख रुपये कर्ज माफी ऐवजी व्यक्तीनिहाय दीड लाख रुपये कर्ज माफी मिळणे शक्य झाले. सन 2008 व 2009 च्या कर्जमाफी योजनेत लाभ मिळण्यास वंचित राहिलेल्या पात्र शेतकरी खातेदारांना देखील या योजनेचा लाभ देण्याचे निश्‍चित केले आहे. त्याचबरोबर इमू पालन, शेडनेट, पॉलिहाऊस याबाबत थकीत असलेल्या कर्जाचा सुद्धा यात समावेश करण्यात आला आहे.

957 कोटी खात्यावर वर्ग : एकरकमी फेडीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकर्‍यांना मिळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांच्या समोर महत्त्वाच्या अडचणी उभ्या आहेत. शेतकर्‍यांनी ऑनलाईन सादर केलेली माहिती व बँकांनी शेतकर्‍यांची ऑनलाईन सादर केलेली माहिती यात तफावत असणे, चुकीचा आधार क्रमांक, चुकीचा खाते नंबर, चुकीचे मॅपिंग या बाबी अडसर ठरत आहेत. बँकांनी कर्ज खात्याचे मॅपिंग करताना चुकीची टीएलसी निवडल्यामुळे आशा खात्यांचा तालुका स्तरावर निर्णय घेता येत नाही. या सारख्या तांत्रिक चुकांमुळे शेतकरी वर्गास लाभ मिळण्यास विलंब होत आहे.

मुदतवाढीचा लाभ घ्यावा : कांबळे
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत एकरकमी कर्जफेड करताना दीड लाख रुपयांचा लाभ होणार आहे. एकवेळ समझोता योजनेसाठी शेतकर्‍यांनी त्यांच्या हिश्श्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधीची मुदत येत्या 31 डिसेंबर पर्यंत वाढविण्यात आली असून जास्तीत जास्त पात्र शेतकर्‍यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक निबंधक हरिश्‍चंद्र कांबळे यांनी केले आहे.