पंतप्रधान मोदींमुळे युक्रेन युद्ध काही काळासाठी थांबलं; राजनाथ सिंहांचं विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rajnath-singh

रशियासोबतच्या युद्धादरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नांबद्दल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं.

लंडनमधील नागरी स्वागत समारंभात बोलताना सिंग म्हणाले की, अडकलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या परतीसाठी सुरक्षित कॉरिडॉर करण्यासाठी पंतप्रधानांनी रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांतील नेत्यांशी चर्चा केली. मोदींच्या मुत्सद्दी प्रयत्नांमुळे लढाईत चार ते पाच तासांचा विराम मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

यूकेच्या अधिकृत भेटीदरम्यान सिंग यांनी विधान केलं, ‘रशिया आणि युक्रेनमधील लष्करी संघर्ष सुरू झाल्यानंतर, युक्रेनमध्ये शिकणाऱ्या आमच्या मुलांचे पालक त्यांच्या ठावठिकाणांविषयी आणि वैयक्तिक सुरक्षिततेबद्दल चिंतित होते. सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी ते काम पंतप्रधानांनी ते स्वतःवर घेतलं. युक्रेनमधून आपले विद्यार्थी सुरक्षित मायदेशी परतण्यासाठी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला. अमेरिकेच्या कोणत्याही हस्तक्षेपामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीच्या मार्गात अडथळा येणार नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी संवाद साधला. युक्रेनमधून 22,000 हून अधिक विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी चार ते पाच तास लढाई थांबवण्यात आली’.

युक्रेनमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानींना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनं ऑपरेशन गंगा अंतर्गत एकूण 80 उड्डाणं चालवली. स्थलांतरितांना जमिनीच्या मार्गाने रोमानिया, हंगेरी, पोलंड आणि स्लोव्हाकिया यांसारख्या शेजारील देशांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आणि नंतर त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलं.