सक्तीच्या रजेचे लोण संरक्षण मंत्रालयातही; स्वर्णश्री राव यांना रजेवर पाठवले !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सीबीआयमधील अंतर्गत संघर्षानंतर संचालक आलोक वर्मा यांच्यासह दोन बड्या सीबीआय अधिकाऱ्यांना केंद्र सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. आता सक्तीच्या रजेचे हे लोण थेट संरक्षण मंत्रालयातही पोचले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या स्वर्णश्री राव राजशेखर यांना माजी नौदल प्रमुखांच्या मतावर वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे . स्वर्णश्री यांच्या जागी आता कर्नल अमान आनंद हे या मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून कामकाज पाहणार आहेत.

माजी नौदल प्रमुख ऍडमिरल अरुण प्रकाश यांनी ,खरे तर ,सैनिक नसलेल्या व्यक्तीकडून सैन्याच्या चिन्हाचा दुरुपयोग होणे गुन्हा नाही ,पण लष्कराच्या जनरल कमांडिंग इन चीफ सारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या आर्थिक सल्लागार असलेल्या अशा व्यक्तीला फटकारलेच पाहिजे असे मत ट्विटवरून व्यक्त केले होते. माजी नौदल प्रमुखांच्या या ट्विटला उत्तर देताना संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्या स्वर्णश्री यांनी ट्विटद्वारे सैन्याच्या बड्या अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या विशेषाधिकाराच्या दुरुपयोगावर टीका केली होती. त्यांनी ट्विटमध्ये ,सैन्यातील अधिकारी आपल्या घरी सामान्य जवानांना राबवतात त्यावर तुमचे काय म्हणणे आहे? सरकारी गाड्यांमधून अधिकाऱ्यांच्या पत्नी शॉपिंगला जातात हे कसे विसरता येईल ? आणि वारंवार होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पार्ट्यांचा खर्च कोण करते ? असे वादग्रस्त प्रश्न विचारले होते.

स्वर्णश्री यांच्या या ट्विटवरून मोठा वाद उफाळला होता. उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांचा अपमान करणाऱ्या अशा प्रवक्त्यांना सैन्य दलात ठेवणे हा जवानांचा अपमान असून त्यांना तात्काळ पदावरून हटविण्याची मागणीही आजी -माजी लष्करी अधिकाऱ्यांनी केली होती.सेवानिवृत्त मार्शल मनमोहन बहादूर यांनीही राव यांच्या ट्विटचा निषेध केला होता.भाजप खासदार राजीव चंद्रशेखर यांनी नाराजी व्यक्त करीत प्रवक्त्या स्वर्णश्री यांच्या चौकशीची मागणी केली. त्यानंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गंभीर दाखल घेत स्वर्णश्री यांच्यावर कारवाई केली आणि संबंधित ट्विटही काढून टाकण्याचे आदेश दिले.