
पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच पदवीचे प्रमाणपत्र मिळेल. पदवी प्रमाणपत्रावर ‘कोविड19’ असा उल्लेख असणार नाही, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. या निर्णयामुळे असंख्य विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर बोलताना सामंत यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यात येणार असल्याचे सांगितले.
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून तयारी केली आहे. पदवीच्या प्रमाणपत्रावर कोविड – 19 च्या संदर्भाने काहीही उल्लेख नसेल. मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल, त्यामध्ये काहीही बदल होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी, प्राध्यापक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.


























































