विद्यार्थ्यांचा कल सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांकडे, पदवी प्रवेशासाठी 2 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारावीनंतर आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स या केवळ पारंपरिक अभ्यासक्रमांकडे वळण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा कल रोजगाराभिमुख सेल्फ फायनान्स कोर्सेसकडे वाढला आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यास विद्यार्थी उत्सुक आहेत. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयात 2 लाख 16 हजारांवर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून वेगवेगळय़ा अभ्यासक्रमांसाठी मिळून 5 लाख 60 हजार अर्ज केल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पदवी प्रवेशाच्या प्रवेशपूर्व नोंदणीला सुरुवात केली आहे. मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेशासाठी ही प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. या नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. 25 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 29 जूनला, दुसरी यादी 7 जुलै आणि तिसरी व अंतिम यादी 14 जुलै रोजी जाहीर होणार आहे. सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचे प्रवेश अतिरिक्त जागांना परवानगी देऊन केले जाणार आहेत. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना निकाल लवकर जाहीर झाल्याने प्रवेशाची मोठी संधी आहे.

बीएमएस, बीएफएम, बीएएफ, बीबीआयला मागणी

बीएस्सी, बीकॉमबरोबर बीएमएस, बीएफएम, बीएएफ, बीबीआय या सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांना अधिक मागणी आहे. या अभ्यासक्रमांच्या तुकडय़ांना अनुदान मिळत नसल्याने 35 ते 55 हजारांच्या घरात या अभ्यासक्रमांची फी आहे. कॉमर्स शाखेत बँकिंग आणि इन्शुरन्स या क्षेत्रांची आवड असणारे विद्यार्थी बीबीआयला पसंती दर्शवत आहेत. बॅचलर इन अकाउंटिंग ऍण्ड फायनान्स या विषयामध्ये फायनान्शिअल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, बिझिनेस कम्युनिकेशन, ऑडिटिंग, इन्शुरन्स या विषयाचे ज्ञान मिळत असल्याने याकडे कल असल्याचे दिसून येत आहे. प्रसार माध्यमे, जाहिरात क्षेत्रात या विद्यार्थ्यांना संधी मिळत असल्याने कला शाखेतून मास मीडियाकडे वळण्यात विद्यार्थ्यांचा कल आहे. बीएमएमलाही नामवंत महाविद्यालयात जागांना मागणी आहे.