पाढे बोलता आले नाही म्हणून चिमुरड्याला भिंतीवर आपटून मारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

नवी दिल्लीतील कापसहेडा भागात काळजाचा थरकाप उडवणारी भयंकर घटना घडली आहे. पाढे बोलता आले नाही म्हणून सावत्र पित्याने पाच वर्षाच्या चिमुरड्याला भिंतीवर आपटून ठार केले आहे. युवान उर्फ युवी असे या मृत चिमुरड्याचे नाव आहे. तर नरेंद्र असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

युवानच्या आईचे लग्न 2012 साली सूर्य़ प्रताप सिंह या व्यक्तीबरोबर झाले होते. पण दोघांमध्ये सतत खटके उडत होते. याचदरम्यान युवीचा जन्म झाला. त्यानंतर सिंह यांना पत्नीचे नरेंद्र नावाच्या तरुणाबरोबर अनैतिक संबंध असल्याचे समजले. त्यावरून पती पत्नीमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर 2018 साली सिंह यांची पत्नी युवीला घेऊन कायमची माहेरी निघून गेली. पण त्यानंतरही सिंह यांनी पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती घरी येण्यास तयार नव्हती. ती नरेंद्रबरोबरच राहत होती. मात्र युवीला त्याच्या वडिलांची भेट व्हावी यासाठी ती सिंह यांच्याकडे वरचेवर जायची. काही दिवसांपूर्वीही ती युवीला घेऊन सिंह यांच्याकडे गेली होती. त्यावेळी मला दोन पप्पा असून दुसऱ्या नरेंद्र पप्पांना मी आवडत नाही असे त्याने सिंह यांना सांगितले. पण सिंह यांनी यास गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर 10 जानेवारी रोजी नरेंद्र युवीचा अभ्यास घेत होता. तो सावत्र मुलगा असल्याने युवीबद्दल त्याला रागही होता. त्याने युवीला पाढे म्हणायला सांगितले. पण युवीला काही पाढे आठवत नसल्याने तो मध्ये अडखळत होता. यामुळे चिडलेल्या नरेंद्रने युवीला उचलले व समोरच्या भिंतीवर आपटले. त्यानंतर युवीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.पण उपचारादरम्यान 12 जानेवारीला युवीचा मृत्यू झाला.