Delhi Bomb Blast – लखनौतील महिला डॉक्टर शाहीनच्या गाडीत सापडली AK-47! दिल्ली बाॅम्बस्फोटाशी तिचेही कनेक्शन

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण कार स्फोटाने सर्वांना हादरवून टाकले आहे. यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 24 हून अधिक जण जखमी झाले. फरिदाबाद दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसंदर्भात जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी लखनऊच्या लाल बाग येथील डॉ. शाहीन शाहिद नावाच्या एका लेडी डॉक्टरला अटक केली आहे. तिच्या कारमधून एके-47 रायफल, एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती.

शाहीन ही लालबाग परिसरातील रहिवासी आहे आणि फरिदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित होती. डॉ. शाहीन शाहिद ही फरिदाबाद दहशतवादी कटात अटक झालेल्या डॉ. मुझम्मिल शकील याची सहकारी आणि प्रेयसी होती.

फरिदाबादमध्ये अटक करण्यात आलेली संशयित दहशतवादी डॉ. शाहीन शाहिद हिचे लखनऊशी संबंध असल्याची बातमी आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्कता निर्माण झाली आहे. शाहीनच्या फोनवर लखनऊ क्रमांकांवर संपर्क असल्याचे पुरावे सापडले आहेत. शाहीन आणि मुझ्झमिल हे दहशतवादी मॉड्यूलशी जोडलेले असू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डॉ. शाहीन हिची गाडी डॉ. मुझम्मिल शकील याने वापरली होती, त्याला याच प्रकरणात अटक केली असून तपास सुरु आहे.

मुझम्मिलकडे सापडलेल्या कारचा आरसी शाहीनच्या नावावर नोंदणीकृत आहे. तिच्या कारच्या डिक्कीतून एके-47 रायफल आणि अनेक मॅगझिन जप्त करण्यात आले. शाहीन स्वतः एका प्रतिष्ठित रुग्णालयात डॉक्टर आहे. तिच्या अटकेनंतर, गुप्तचर संस्थांनी तिचे कॉल डिटेल्स, बँक व्यवहार आणि सोशल मीडिया चॅट्सची सखोल चौकशी सुरू केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहीनच्या फोनवरून लखनऊच्या अनेक नंबरशी वारंवार संपर्क होत असल्याचे दिसून आले आहे. यापैकी काही नंबर लालबाग, चौक आणि केसरबाग सारख्या भागात आहेत.