
>> नीलेश कुलकर्णी
गंगेच्या शुद्धीकरणासाठी ‘भगीरथा’प्रमाणे प्रयत्न करणारे आणि गंगा ऍक्ट लागू करण्यासाठी 111 दिवस उपोषण करणारे प्रा. जी. डी. अग्रवाल अखेर गंगेच्याच कुशीत गेल्या आठवड्यात विसावले. 86 वर्षांच्या या भगीरथाचे निधन झाल्यावर नेहमीप्रमाणे पंतप्रधानांसह इतर मंत्र्यांनी ट्विटरवर श्रद्धांजली वाहून ‘राजधर्मा’चे पालन केले. मात्र त्यापूर्वी अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची तसदी ना पंतप्रधान मोदींना घ्यावी वाटली ना गंगा शुद्धीकरणाचा अतिरिक्त ‘कार्यभार’ असणारे मंत्री नितीन गडकरी यांना वाटली. ‘गंगा ऍक्ट’ लागू करण्याची मागणी करीतच या ‘गंगापुत्रा’ला अखेर बलिदान द्यावे लागले. दुर्दैवाने ‘राम तेरी गंगा मैली’ हेच आजही वास्तव आहे.
‘गंगा’ हा देशवासीयांसाठी श्रद्धेचा विषय आहे. काँग्रेसने देशात ‘भ्रष्टाचाराची गटारगंगा’ आणली अशी टीका भाजपवाले नेहमीच करतात. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराच्या आणि प्रत्यक्ष गंगेच्या शुद्धीकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही तरी करतील अशी भोळ्याभाबड्या जनतेची अपेक्षा होती, मात्र ‘नमामि गंगे’ म्हणत गंगेची आरती करण्याच्या ‘इव्हेंट’पलीकडे गेल्या चार वर्षांत काहीही घडलेले नाही. गंगा शुद्धीकरणाचे स्वतंत्र खाते निर्माण करून त्याचा कार्यभार साध्वी असलेल्या उमा भारतींकडे सुरुवातीला देण्यात आला. त्यांना या कामात अपयश आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे या खात्याची अतिरिक्त जबाबदारी सोपवली गेली. मात्र तरीही गंगा शुद्धीकरणाच्या बाबतीत फारसे पात्रात काहीच पडले नाही.
अयोध्येत राममंदिर व गंगा नदी हे हिंदूंच्या श्रद्धेच्या विषयांची सरकारने कुचेष्टा सुरू केली आहे. गंगा ही महाकाय नदी आहे आणि एका दिवसात तिचे शुद्धीकरण होणे अशक्य आहे. त्यासाठी निश्चितच कालावधी जावा लागेल. मात्र श्रद्धेच्या नावाखाली मोठमोठ्या घोषणा करून आता जी फेकंफाक केंद्र सरकार करत आहे ते पाहून ‘भीक नको, पण कुत्रा आवर’ अशी वेळ जनतेवर आली आहे. दस्तुरखुद्द पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात गंगेची अत्यंत वाईट अवस्था आहे. शुद्धीकरणासाठी दररोज एक नवी ‘आयडियाची कल्पना’ मांडली जाते, पण प्रत्यक्षात कृती शून्य. ‘गंगा ऍक्ट’ लागू करावा यासाठी प्रा. जी. डी. अग्रवाल नावाच्या तपस्वी माणसाने उपोषण केले. ते भाजपाच्या कार्यकाळात केले असते तर त्यांना ‘काँग्रेसचा एजंट’ म्हणणे सत्ताधार्यांना सोपे गेले असते, मात्र जी. डी. अग्रवाल यांनी मनमोहन सिंग सरकार सत्तेवर असतानाही अशाच प्रकारचे उपोषण केल्यामुळे गंगेची उपनदी असेलल्या भागीरथीवरील लोहारी, नागपाला, भैरव घाटी, पाला मनेरीसारखे प्रकल्प सरकारला रद्द करावे लागले होते, मात्र मोदींनी सत्तेवर येताच या प्रकल्पाला चालना दिली. ‘बांधमुक्त गंगा’ हा अग्रवालांचा ध्यास होता. त्यासाठी ते 111 दिवस सरकारविरोधात लढले, मात्र सत्ताधार्यांपर्यंत त्यांचा आवाज दुर्दैवाने पोहोचला नाही. अखेर सरकारची सरशी झाली आणि गंगापुत्राला बलिदान द्यावे लागले.
अभिनंदन पाठकांचा ‘डुप्लिकेट रोल’
डुप्लिकेट किंवा ‘डबल रोल’च्या भूमिकेमुळे बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमे सुपरडुपरहिट झालेले आहेत, मात्र यूपीमध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डुप्लिकेटने भाजपाईंचा झोप उडवली आहे. मोदींसारखे हुबेहूब दिसणारे गृहस्थ त्यांचे नाव अभिनंदन पाठक! 2014 पूर्वी देशातील इतर जनतेप्रमाणेही या पाठकांनाही मोदींच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ पडली आणि थोडेफार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी साधर्म्य असणार्या अभिनंदन पाठकांनी दाढीमिश्या अगदी मोदींप्रमाणेच कोरीव-रेखीव करून घेतल्या. निवडणुकीत भाजपचा भरभरून प्रचारही केला, मात्र जी गत जनतेची झाली तीच गत पाठकांची झाली. त्यामुळे पाठक सध्या अस्वस्थ आहेत. मात्र मोदींचे डुप्लिकेट असल्याने एकेदिवशी ते थेट लखनौमधील काँग्रेस कार्यालयाकडे गेले. बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना ‘अरे प्रधानमंत्रीजी हमारे दफ्तर आ रहै है… मोदी जी आ रहे है…’ असा भास होऊन धक्काच बसला. पंतप्रधान कसे आपल्या पक्ष कार्यालयात येतील, असाही रास्त सवाल त्यांच्या मनात आला. जवळ आल्यानंतर त्यांच्या मनातील संभ्रम दूर झाला. त्यानंतर आता हे अभिनंदन पाठक ‘काँग्रेसवासी’ झाले आहेत. मोदींविरोधात त्यांनी मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम वगैरे ठीक आहे, मात्र या पाठकांची मोदींमुळे भलतीच पंचाईत झाली आहे. मोदींसारखे ‘हुबेहूब’ दिसत असल्यामुळे अनेक ठिकाणी या पाठकमहाशयांना जनतेने घेराव घालून ‘हमारे अकाऊंट में 15 लाख कब जमा होंगे’, असा भडिमार सुरू केल्यामुळे पाठक चांगलेच गांगरून गेले आहेत. नको ते भाजप, नको ते काँग्रेस आणि त्याहीपेक्षा ‘मोदींचे डुप्लिकेट’ तर अजिबातच नको अशीच अवस्था पाठकांची झाली आहे. या ‘डुप्लिकेट रोल’ मधून पाठकमहाशय कसे बाहेर पडतात ते बघूयात.
रम्या यांचा बळी
कन्नड अभिनेत्री आणि काँग्रेसचा सोशल मीडिया जबरदस्त पद्धतीने सांभाळणार्या दिव्या स्पंदना ऊर्फ रम्या यांना त्या पदावरून दूर करून काँग्रेसने अजूनही आपण सुधारणार नसल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेसला गटबाजीचा शाप आहे आणि चांगले काम करणार्यांचे पंख तिथे नेहमीच छाटले जातात. पोटनिवडणुकीत लोकसभेवर निवडून आल्यानंतर दिव्या स्पंदना यांचा राहुल गांधींच्या वर्तुळात प्रवेश झाला. त्यानंतर राजकारणात काहीसे बाजूला पडल्यानंतर काँग्रेसच्या सोशल मीडियाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने हाताळत दिव्या यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भंबेरी उडवली. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर किमान दोन वर्षे या सरकारविरोधात सोशल मीडियावर बोलण्याची कोणाची हिंमत नसायची. सरकारविरोधी टीका केली की त्यावर भक्तांची ‘ट्रोलधाड’ पडायची. या विपरीत स्थितीत दिव्या यांनी सोशल मीडिया या दुधारी शस्त्राचा कौशल्याने वापर करत भाजपला सळो की पळो करून सोडले. एरवी मैदानात काँग्रेसजन ढेपाळलेले असताना आणि लोडाला टेकून दरबारी राजकारण करण्यात मग्न असताना दिव्या यांनी किमान सोशल मीडियावर तरी काँग्रेस ‘जिवंत’ ठेवली, मात्र पंतप्रधानांविरोधात वादग्रस्त ट्विट केल्यानंतर त्यांचे पंख छाटण्याचे प्रकार सुरू झाले. सॅम पित्रोदा आणि काँग्रेसचे मीडिया विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांच्याशी त्यांचे खटके उडायला लागले. या वादाला उत्तर हिंदुस्थान विरुद्ध दक्षिण हिंदुस्थान अशीही एक किनार मिळाली. या कालपरवाच्या महिलेला पक्षात मानाचे स्थान मिळाले तर आपले काय होईल, ही चिंता काँग्रेसी ढुढ्ढाचार्यांना वाटू लागली. त्यातून दिव्या स्पंदना यांचा बळी गेला. ‘काँग्रेसच काँग्रेसला पराभूत करते’ असा एक वाक्प्रचार काँग्रेसच्या बाबतीत प्रचलित आहे. राहुल गांधींच्या काळातही काँग्रेसमध्ये ‘पहिले पाढे पंचावन्न’ आहेत हेच खरे.
































































