
<<नीलेश कुलकर्णी>>
लालूप्रसाद यादवांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप नेहमीच आपल्या ‘प्रतापां’मुळे चर्चेत असतात. तेजबाबूचे दोनाचे चार केल्यानंतर ते शांत बसतील अशी भाबडी अपेक्षा राबडीदेवींना होती, मात्र चतुर्भूज झाल्यानंतर त्यांचा वारू चौखूर उधळत आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदींच्या चिरंजीवाचे लग्न उधळून लावण्याची धमकी तसेच पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह शेरेबाजी यामुळे तेजप्रताप यांची खरी ‘ओळख’ बिहारमधील जनतेस आधीच झाली आहे. लालूंची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी घरी येऊ इच्छिणाऱया मुख्यमंत्री नितीशकुमार यांना ‘नितीश चाचा नो एण्ट्री’ असा बोर्ड गेटवर लावून मज्जाव करणारे हेच तेजप्रताप होते. मात्र आता त्यांनी बॉलीवूडमध्ये नशीब अजमावण्याचे ठरवले आहे. ‘रुद्रा द टायगर’ या चित्रपटाद्वारे ते मोठय़ा पडद्यावर येत आहेत. त्यामुळे बिहारमध्ये सध्या तेजूबाबूंची चर्चा जोरात आहे. तसे लालूंचे कनिष्ठ चिरंजीव क्रिकेट खेळायचे. आयपीएलसाठी दिल्लीच्या संघात त्यांची वर्णीही लागली होती. मात्र ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये संधी न मिळाल्यामुळे लोकसभेत त्यावेळी भाषण करताना लालू यादवांनी आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवारांना उद्देशून, ‘बबुआ टीम में तो है लेकिन सिर्फ सेवापानी कर रहा है. पानी देना ड्रिंक्स देना, आप उसे मौका दे दो बढिया खेलेगा’ असे भाषण ठोकल्यानंतर लोकसभेत हास्याची कारंजी उडाली होती. क्रिकेट सोडून तेजस्वी राजकारणाच्या पिचवर लवकर सेट झाले. मात्र तेजप्रतापांना तितकेसे राजकारणात सेट होता आलेले नाही. त्यातच ‘तेजप्रताप विरुद्ध तेजस्वी’ असा संघर्ष बिहारच्या राजकारणात होताना दिसत आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये नशीब अजमावू पाहणारे तेजप्रताप त्या मायावी नगरीत यशस्वी होतील की नाही ते यथावकाश कळेलच. तूर्तास ‘फॅमिली ड्रामा’ ते पिक्चरपेक्षा जास्त गाजवताना दिसत आहेत हे नक्की.
























































