रस्ते चांगले हवेत तर टोल द्यावाच लागेल!

88
nitin-gadkari
नितीन गडकरी

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

सरकारकडे विकासकामांसाठी हवा असलेला पैसा नाही. पाच वर्षांत देशात 40 हजार किमींचे राज्यमार्ग तयार करण्यात आले आहेत. चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावाच लागणार. टोल उभ्या आयुष्यात बंद होऊ शकणार नाही. मात्र गरजेनुसार थोडा कमी-जास्त होऊ शकतो, असे केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

लोकसभेतील चर्चेदरम्यान देशातील विविध भागात रस्त्यांवर टोलवसुली सुरू असल्याबाबत काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री गडकरी यांनी लोकांना चांगल्या सुविधा हव्या असतील तर पैसे मोजावेच लागतील. काही केल्या टोल बंद करता येणार नसल्याचे सांगितले. ज्या भागातील जनतेची टोल देण्याची क्षमता आहे त्या भागातच टोलवसुली केली जाते. या पैशांतून ग्रामीण आणि डोंगराळ भागात रस्ते बांधले जात असल्याचेही ते म्हणाले.

रस्त्यांच्या निर्मितीत जमिनींचे अधिग्रहण करणे हा फार महत्वाचा मुद्दा आहे. बऱयाचवेळा रस्तेनिर्मितीसाठी आवश्यक जमीन उपलब्ध झाली नाही तर प्रकल्पाचा खर्च वाढतो आणि त्याचा बोजा जनतेला सोसावा लागतो. त्यामुळे या प्रकरणात राज्य सरकारने योग्य तो तोडगा काढण्याची गरज आहे. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये जमिनींचे अधिग्रहण प्रक्रिया धिम्या गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

लहान मुलांच्या सुरक्षेची काळजी
वाहन कायद्यात बदल करणारे विधेयक संसदेत मांडण्यात आले. या विधेयकात लहान मुलांसाठा दोन नियम करण्यात आले आहेत. कारमध्ये बुस्टर सीट लावावी लागणार आहे. मागील सीटवर बसल्यास हा नियम लागू होणार आहे. मागील सीटवर बुस्टर किंवा चाईल्ड सीट लावाता येते ज्यामध्ये लहान मुलाला बसवून त्याला सीटबेल्ट लावता येणार आहे. यामुळे अचानक ब्रेकिंग किंवा अपघात झाल्यास मुलाला मार बसण्याची शक्यता कमी होईल. तसेच चार वर्षांपेक्षा मोठय़ा मुलांसाठी बाईकवरून जाताना हेल्मेट घालावे लागणार आहे.

टोलचा जन्मदाता मी आहे. टोल आयुष्यभरासाठी बंद करता येणार नाही. टोलची रक्कम कमी-जास्त होऊ शकते. नागरिकांना चांगली सेवा हवी असेल तर त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतील, असे गडकरी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या