
दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिसऱ्यांदा ईडीने समन्स पाठवलं आहे. ईडीने 21 डिसेंबर रोजी केजरीवाल यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, केजरीवाल हे या चौकशीला गैरहजर राहिले. त्यामुळे आता तिसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आलं आहे.
केजरीवाल यांना ईडीकडून या आधीही दोन वेळा नोटीस पाठवण्यात आली होती. पण, केजरीवाल यांनी ईडीसमोर हजेरी लावली नव्हती. ईडीने दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला आहे. यापूर्वी 2 नोव्हेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांना नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र, केजरीवाल आणि आपच्या अन्य नेत्यांनी ही नोटीस बेकायदेशीर असल्याचं म्हणत ती परत घ्यावी अशी मागणी उचलून धरली होती. त्यानंतर पुन्हा 21 डिसेंबर रोजी हजर राहण्यासाठी त्यांना समन्स बजावण्यात आलं.
मात्र, यावेळी केजरीवाल हे पंजाबच्या होशियारपूर येथे विपश्यनेसाठी गेलेले असल्याने ते या समन्सला उत्तर देण्यासाठी हजर राहिले नाहीत. त्यामुळे आता त्यांना तिसऱ्यांदा समन्स पाठवून 3 जानेवारी रोजी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत.






















































