वायू प्रदूषणामुळे दरवर्षी 15 लाख जणांचा मृत्यू; 9 वर्षांनी आयुष्यमान घट असल्याची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीनंतर दिल्लीतील वायूप्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. आनंद विहार भागात एअर क्लाविटी इंडेक्स (एक्यूआय) 600 च्या वर पोहचला आहे. सिस्टम ऑफ एयर क्वालिटी अँड वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्चने (SAFAR) शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीतील एक्यूआय 456 आहे. तसेच दरवर्षी वायू प्रदूषणामुळे 15 लाख जणांचा जीव जातो आणि नागरिकांचे आयुष्यमान 9 वर्षांनी कमी होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

नवी दिल्ली एनसीआर भागातील नागरिकांचे आयुष्यमान वायू प्रदूषणामुळे 9.5 वर्षांनी कमी होत असल्याची माहिती पर्यावरणतज्ज्ञ विमलेंद्रू झा यांनी दिली. तसेच फुफ्फुसांचे आजार होण्याचे प्रमाणही वाढले आहे. वायू प्रदूषणामुळे शहरातील प्रत्येक तिसऱ्या मुलाला दम्याचा त्रास असल्याचे दिसून आले आहे. ही चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात दिल्लीतील वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. पंजाब, हरियाणा,पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये या काळात शेतातील तण जाळत असल्याने तसेच दिवाळीतील फटाक्यांमुळे वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचप्रमाणे गाड्यांमुळे, फॅक्टरीतील दूषित वायू यामुळेही प्रदूषणात वाढ होते. सरकारने तण जाळण्यावर बंदी घातली आहे. तसेच त्यावर दंडही आकरण्यात येतो. तरीही तण जाळण्याच्या घटना कमी झालेल्या नाहीत.

दिवाळीनंतर दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानातही मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणात वाढ होत आहे. वाढत्या वायू प्रदूषणाबाबत एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी चिंता व्यक्त केली आहे. वायू प्रदूषणामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. वायू प्रदूषण वाढलेल्या भागात कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला आहे. कोरोना रुग्ण, दम्याचा त्रास असलेले आणि फुफ्फुसांचा आजार असलेल्यांना वायू प्रदूषणाचा जास्त त्रास होत असल्याचेही त्यांनी सांगितले.