एसी बंद झाल्यामुळे विमानातील तापमान वाढले; दिल्ली-पुणे विमानात 150 प्रवासी घुसमटले,  ‘स्पाईस जेट’ प्रशासनाचा प्रवाशांच्या जिवाशी खेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
spicejet-delhi-pune-flight-ac-not-working-passenger-protest-flight-changed

दिल्लीहून पुण्याला उड्डाण करण्यासाठी धावपट्टीवर उतरवलेल्या स्पाईस जेटच्या विमानातील तापमान प्रचंड वाढल्यामुळे जवळपास 150 प्रवाशांची अक्षरशः घुसमट झाली. विमानातील एसी बंद झाल्यामुळे तापमान वाढले. या विमानात प्रवासी तब्बल दोन तास अडकल्याने लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यात अनेकजण बेशुद्ध पडले. दिल्ली विमानतळावर मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. नादुरुस्त विमान प्रवासीसेवेत उतरवून स्पाईस जेटप्रशासनाने प्रवाशांच्या जिवाशी खेळ केल्याचा संताप प्रवाशांनी व्यक्त केला.

दिल्ली-पुणे मार्गावरील स्पाईस जेटच्या विमानाची उड्डाणाची वेळ रात्री 9.55 वाजताची होती, मात्र प्रत्यक्षात 10.30 वाजता विमानात प्रवाशांचे बार्ंडग सुरू करण्यात आले. विमान धावपट्टीवरच असताना अचानक आतील तापमान प्रचंड वाढले. आतील एसी बंद झाल्याने प्रवाशांनी आरडाओरड सुरू केली. हळूहळू तापमान भयंकर वाढले आणि प्रवाशांना अस्वस्थ वाटू लागले. सर्व प्रवासी घामाघूम झाले. लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वास घेण्यास खूप त्रास झाला. त्यात प्रवासी बेशुद्ध पडले. ही भयंकर स्थिती निर्माण झाल्याने प्रवाशांनी उड्डाण न करण्याबाबत पॅप्टन आणि क्रू मेंबर्सना विनवणी केली. मात्र दोन तास प्रवाशांच्या गंभीर त्रासाकडे स्पाईस जेटच्या कर्मचाऱयांनी दुर्लक्ष केले. तसेच प्रवाशांशी उद्धट भाषा, अरेरावी सुरू केली. त्यावर प्रवाशांनी गोंधळ घातल्यानंतर विमान पार्ंकग क्षेत्राकडे नेऊन प्रवाशांना उतरवण्यात आले. दोन तासांच्या घुसमटीनंतर प्रवासी बाहेर आले. हा भयानक प्रकार अनुभवलेल्या प्रवाशांनी विमानतळावरच आंदोलन केले.

100 ते 150 जवान आणून प्रवाशांवरच दडपशाही!

स्पाईस जेटच्या कर्मचाऱयांनी प्रवाशांवर अरेरावी केली आणि तेच विमान उड्डाण करणार असल्याचे सांगितले. मात्र प्रवाशांनी तांत्रिक बिघाड असलेल्या विमानात बसण्यास नकार दिला. जीव धोक्यात घालण्याऐवजी तिकिटाचे पैसे मागे देण्याची मागणी प्रवाशांनी केली आणि विमानतळावर ठिय्या मांडला. यावेळी आमचा आवाज दाबण्यासाठी स्पाईस जेटच्या कर्मचाऱयासोबत सीआयएसएफचे 100 ते 150 जवान आणण्यात आले होते, असे पुण्यातील प्रवासी लेशपाल जवळगे यांनी सांगितले. याकडे पेंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने गांभीर्याने लक्ष देऊन स्पाईस जेट पंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रवाशांनी संपूर्ण रात्र विमानतळावर काढली!

प्रवाशांच्या आंदोलनानंतर तांत्रिक टीम आली आणि विमानाची तपासणी केली. त्यानंतर दुसऱया विमानाची व्यवस्था करण्यात आली. ‘स्पाईस जेट’च्या बेफिकीर कारभाराचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. प्रवासी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दिल्ली विमानतळावर आले होते. पहाटे पाचच्या सुमारास त्यांच्या विमानाने पुण्याच्या दिशेने उड्डाण केले.