मोदींची बंगाली जादू, ममतांना जबर धक्का!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

तीन आमदार आणि 50 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

लोकसभा निवडणुकीत झटका बसलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा राजकीय हादरा बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे दोन आमदार आणि 50 नगरसेवकांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच माकपचा 1 आमदारही भाजपमध्ये दाखल झाला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने जबरदस्त कामगिरी केली. 42 जागांपैकी भाजपने 18 जागांवर विजय मिळविला. तृणमूल काँग्रेसला 22 जागा मिळाल्या. काँग्रेसला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. 2014 मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपचे दोन खासदार होते. आज भाजपने तृणमूल काँग्रेसला पुन्हा हादरा दिला आहे. तृणमूलचे आमदार सुभ्रांशू रॉय, तुषारक्रांती भट्टाचार्य आणि माकपचे आमदार देवेंद्र रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुभ्रांशू हे भाजप नेते मुकुल रॉय यांचे पुत्र आहेत. गेल्या वर्षी मुकुल रॉय यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच 50 नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीत भाजप मुख्यालयात हा प्रवेश सोहळा झाला. भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी विजय वर्गीय यांनी या सर्वांचे स्वागत केले.

सात टप्प्यांत तृणमूलला झटका

पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत मतदान झाले. त्याप्रमाणे सात टप्प्यांत तृणमूल काँग्रेसला झटका देण्याची तयारी भाजपने केली आहे. यासंदर्भात विजय वर्गीय म्हणाले, मंगळवारी प्रवेशाचा पहिला टप्पा पार पडला. आता सात टप्प्यांत तृणमूल नेते भाजपमध्ये प्रवेश करतील.

शपथविधीला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचे मला निमंत्रण मिळाले आहे. मी उपस्थित राहणार आहे, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. मी इतर मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांचा शपथविधी असे काही कार्यक्रम घटनात्मक असतात. त्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागते असे त्या म्हणाल्या.