साजिद खानला बिग बॉसमधून बाहेर काढा! दिल्ली महिला आयोगाचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिग बॉसचा सोळावा सिझन लाँच होऊन आठवडाभर होऊन देला आहे. अजूनपर्यंत कुणालाही घरातून बाहेर पडलेला नाही. पण, याच दरम्यान घरातील एका स्पर्धकाला घराबाहेर काढण्यासाठी दिल्ली महिला आयोगाने थेट केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

हा स्पर्धक म्हणजे साजिद खान. लैंगिक शोषणाविरोधात चाललेल्या मीटू या कॅम्पेनमध्ये साजिदविरुद्ध लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्याच्या विरोधात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिलं आहे. साजिद खान याला शोमधून काढून टाकण्याची मागणी मालिवाल यांनी पत्रातून केली आहे.

साजिद खानविरुद्ध 10 महिलांनी मीटू चळवळीदरम्यान लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. या सगळ्या तक्रारी साजिदची घृणास्पद मानसिकतेकडे बोट दाखवतात. आता अशा माणसाला बिग बॉसचा स्पर्धक बनवलं गेलं आहे, हे संपूर्णतः चूक आहे. मी अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून साजिद खान याला कार्यक्रमातून बाहेर काढण्याची मागणी केली आहे, असं ट्वीट देखील मालिवाल यांनी केलं आहे.

मीटू्च्या आरोपांनंतर बराच काळ रुपेरी पडद्यापासून दूर राहिलेल्या साजिद खानने मनोरंजन विश्वात पुनरागमन केलं आहे. त्याच्या बिग बॉसमधील प्रवेशावर अनेक सेलिब्रिटींनीही आक्षेप घेतला होता. त्यात उर्फी जावेद, सोना मोहपात्रा, मंदाना करिमी यांचा समावेश आहे.