
राजकुमार भगत, न्हावाशेवा
पावसाळा सुरू असल्याने जंगलातील रानभाज्यानी बाजारपेठा फुलू लागल्या आहेत. सध्या या भागात पाउस जोरदार नसल्यामुळे नेहमीच्या भाज्यांचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. त्यामानाने या पावसाळी हंगामात मिळणाऱ्या रानभाज्या या स्वस्त मिळत असल्याने या रानभाज्यांना ग्राहकांची चांगली मागणी आहे.
उरण तालुका हा बहुतांश डोंगराळ आणि जंगलांनी वेढलेला असल्याने या तालुक्यात अनेक दुर्मीळ आणि औषधी वनस्पती, फळे आणि रानभाज्या आढळतात. उन्हाळा संपून पावसाळ्याची चाहूल लागली की, या भागातील आदिवासी जंगल, डोंगर आणि माळरानात आढळणारे करांदे, हळदे या सारखे कंद गोळा करून त्याची पनवेल, उरण या सारख्या मोठ्या बाजारपेठात विक्री करून आपली उपजीविका करतात. तसेच शेवळा, टाकळा, कंटोळी, कोरळा, कूर्डू यासारख्या रानभाज्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने सध्या या भागातील बाजारपेठा या रानभाज्यानी गजबजून गेल्या आहेत. या प्रकारच्या रानभाज्या या पावसाळ्यातच मिळत असल्याने खवय्याना देखील या रानभाज्यांचे वेध लागलेले असतात.
पावसाळ्यात बहुतांश आदिवासींना रोजगार नसल्याने तालुक्यातील बहुतेक आदिवासी पुरूष आणि स्त्रिया या रानभाज्या गोळा करण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय करतात. त्यावरच त्यांचा दोन तीन महिने उदरनिर्वाह चालतो. चिरनेर, वेश्वी, रानसई, कोप्रोली, आवरे, पुनाडे, सारडे तसेच उरण जवळील द्रोणागिरी डोंगरात अशा प्रकारच्या भाज्या आणि कंद मोठ्या प्रमाणात आढळतात. परंतु गेल्या काही वर्षापासून उरण तालुक्यात विकासाच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात भरावांची कामे सुरू असल्याने या भागातील जंगले, डोंगर आणि माळराने पोखरून त्यांची माती या भरावांसाठी वापरत असल्याने या भागातील जंगल, डोंगर येथून मिळणाऱ्या रानभाज्या आणि इतर कंदाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे पूर्वी एक दोन तासात गोळा करता येणाऱ्या रानभाज्यांना आता पूर्ण दिवस लागत असल्याची खंत या भागातील आदिवासी व्यक्त करत आहेत. त्यामुळे या भागातील आदिवासींच्या अर्थिक उत्पन्नावर याचा परिणाम झाला आहे. तसेच या रानभाज्या कोणतेही खते आणि किटकनाशकांच्या वापराशिवाय मिळत असल्याने या भाज्या पौष्टिक आणि औषधी असतात. त्यामुळे शासनाने या भागातील जंगल आणि आदिवासींचे संवर्धन करण्यासाठी या भागातील जंगल आणि डोंगरातील माती काढण्यास बंदी आणावी अशी मागणी या भागातील आदिवासी करत आहेत.

































































