
महसूल खात्याने पकडलेले डंपर सोडविण्यासाठी दीड लाखांची लाच स्वीकारताना तलाठी आणि मंडळ अधिकार्याला रंगेहात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यामधील अमळनेर गावात घडली.
तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व अमळनेर तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे 3 डंपर आहेत व करारनामा तत्वावर विकत घेतलेले 3 डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर अमळनेर शहरात माती वाहतूक करताना सुमारे 2 महिन्यांपुर्वी तहसिल कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आले होते. या डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे गणेश राजाराम महाजन,(वय 46, व्यवसाय-नोकरी, तलाठी, अमळनेर शहर) आणि दिनेश शामराव सोनवणे, (वय 48, व्यवसाय-नोकरी, मंडळ अधिकारी,अमळनेर) यांनी दोन लाखांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम दीड लाख इतकी ठरली. दरम्यान, तक्रारदाराने याबाबत एसीबीच्या कार्यालयात तक्रार केली.
यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने गुरुवारी पंचासमक्ष दीड लाख रूपये स्वीकारताना दोन जणांना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवायएसपी शशिकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.


























































