
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
1 एप्रिलपासून देना आणि विजया या दोन्ही बँका बंद होणार असून या बँकांचे ‘बँक ऑफ बडोदा’मध्ये विलीनीकरण होणार आहे. दोन्ही बँकांच्या ग्राहकांची खाती बँक ऑफ बडोदामध्ये ट्रान्सफर केली जाणार आहेत.
या आधी स्टेट बँक ऑफ बिकानेर ऍण्ड जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, पटियाला आणि हैदराबाद या बँकांसह भारतीय महिला बँकेत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण झाले होते. विलीनीकरणानंतर ग्राहकांना नवीन खाते क्रमांक आणि ग्राहक आयडी क्रमांक दिला जाणार आहे. तसेच ज्या ग्राहकांना नवीन खाते क्रमांक आणि आयएफसीएस कोड मिळणार आहे त्यांनी इन्कम टॅक्स, इन्शुरन्स, म्युचअल फंड, पेन्शन योजना आदी ठिकाणी नवीन माहिती अपडेट करायची आहे.
- देना आणि विजया बँकेच्या विलीनीकरणामुळे विजया बँकेच्या शेअरधारकांना प्रत्येकी 1000 शेअरमागे बँक ऑफ बडोदाचे 402 इक्विटी शेअर्स मिळणार आहेत.
- तर देना बँकेच्या शेअरधारकांना प्रत्येकी 1000 शेअरमागे बँक ऑफ बडोदाचे 110 शेअर्स मिळणार आहेत.
- नवीन चेकबुक, डेबिट आणि क्रेडिट कार्ड मिळणार आहे
- एफडी आणि आरडीवर मिळणाऱ्या व्याजदरात बदल होणार नाही.
देशातील तिसरी सर्वात मोठी बँक
विलीनीकरणानंतर बँक ऑफ बडोदा देशातील तिसरी सर्वात मोठी बँक ठरणार आहे. सध्या 45.85 लाख कोटी रुपये व्यवसाय मूल्य असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया पहिल्या क्रमांकावर तर 15.4 लाख कोटी मूल्य असलेली एचडीएफसी बँक दुसऱ्या क्रमांकावर आहे. चौथ्या क्रमांकावर आयसीआयसीआय बँक असून तिचे मूल्य 11.02 लाख कोटी इतके आहे. बँक ऑफ बडोदाचे मूल्य 15.4 लाख कोटी रुपये इतके आहे.



























































