
सुनील प्रभू यांनी पाठवलेला ई-मेल बनावट असल्याची तक्रार विधानसभा अध्यक्षांकडे केली; पण ज्या व्यक्तीच्या नावाने ही तक्रार केली आहे त्यांनी तक्रारीसोबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याची हिंमत दाखवली नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी आज एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता सणसणीत चपराक दिली. दरम्यान, तब्बल 318 प्रश्नांनंतर सुनील प्रभू यांची उलटतपासणी संपली.
आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील सातव्या दिवशीच्या सुनावणीची सुरुवात ही ई-मेलच्या मुद्दय़ाने झाली. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी सकाळच्या सत्रात, तर दुपारच्या सत्रात शिवसेना पक्ष कार्यालयाचे सचिव विजय जोशी यांची उलटतपासणी घेतली.
– एकनाथ शिंदे यांना 22 जून 2022 रोजी ज्या आयडीवरून ई-मेल पाठवला तो ई-मेल कधीही वापरला नाही, असा दावा महेश जेठमलानी यांनी केला होता. आज त्यांनी पुन्हा हाच प्रश्न उपस्थित केला. त्यावर सुनील प्रभू यांचे वकील अॅड. देवदत्त कामत उभे राहिले. व्हीप पाठवलेला ई-मेल बनावट आहे अशी तक्रार करण्यात आली. वास्तविक, तक्रारीच्या पत्रासोबत प्रतिज्ञापत्रही सादर करावे लागते; पण ज्या व्यक्तीच्या नावाने बनावट ई-मेलचा अर्ज केला आहे, त्या अर्जासोबत त्या व्यक्तीने प्रतिज्ञापत्र सादर केले नाही याकडे देवदत्त कामत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे लक्ष वेधले
– देवदत्त कामत यांनी विधिमंडळाची मे 2022ची डायरी दाखवली. या डायरीतील एकनाथ शिंदे यांच्या ई-मेलवर व्हीप पाठवला आहे. त्यामुळे ई-मेलमध्ये कोणतीही बनवाबनवी नाही. हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असे कामत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणले.
हातमिळवणी नाही, युती केली
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली का, या प्रश्नावर सुनील प्रभू म्हणाले, शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली हेच सत्य आहे.
महाविकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी व्हीप
4 जुलै 2022 रोजी काढलेल्या व्हीपच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुनील प्रभू म्हणाले की, ज्या आमदारांना व्हीप बजावला त्यांनी पक्षविरोधी कृत्य केले होते. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली होती. महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करावे ही भूमिका होती. त्यासाठी पूर्णवेळ उपस्थित राहून भाजपने मांडलेल्या ठरावाच्या विरोधात महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी मी व्हीप काढला होता.
शिवसेना हिंदुत्वाशी कधीही फारकत घेऊ शकत नाही
शिवसेनेच्या विचारधारेत हिंदुत्वाचा समावेश व विचार आहे का, असा सवाल महेश जेठमलानी यांनी केला. त्यावर एका क्षणाचाही विलंब न लावत सुनील प्रभू यांनी, हो असे उत्तर दिले. शिवसेना पक्षप्रमुख किंवा शिवसेनेकडून हिंदुत्वाचे विचार मवाळ करण्याचा कोणता निर्णय घेतला होता का, या प्रश्नावर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाच्या विचारांपासून कधीही लांब जाऊ शकत नाहीत, असे उत्तर सुनील प्रभू यांनी दिले.
बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट हे अख्ख्या जगाला माहीत
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट नावाने ओळखले जातात हे तुम्हाला माहीत आहे का, या प्रश्नावर सुनील प्रभू प्रत्येक शब्दावर जोर देत मोठय़ा आवाजात उत्तरले… बाळासाहेब ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट आहेत हे अख्ख्या जगाला माहीत आहे.






















































