
मुंबई पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत 40 हजार नवीन शासकीय पोलीस सेवा निवासस्थाने उभारण्यात येणार आहेत. याशिवाय मुंबईत 93 अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज अशी नवीन पोलीस ठाण्यांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेत विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली
उच्चस्तरीय समितीची स्थापना
पोलिसांना मालकी हक्काची घरे देण्यासाठी येत्या सात दिवसात उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली.
आधुनिकीकरणासाठी 733 कोटी
पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या योजनेची आखणी केली आहे. मुंबईत 93 नवीन पोलीस ठाण्यांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पोलिसांसाठी 74 भूखंड
मुंबईतील पोलीस दलासाठी स्वतंत्र गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी मुंबईतील पोलीस विभागाच्या मालकीचे सर्व भूखंड तपासण्यात आले आणि त्यातील 74 मोक्याचे भूखंड विकासासाठी निश्चित करण्यात आले आहेत. या भूखंडांवर टप्प्याटप्प्याने पोलिसांसाठी सुमारे 40 हजार शासकीय निवासस्थाने उभारली जातील.
























































