दत्ता पडसलगीकर फेब्रुवारीत निवृत्त होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्याचे पोलीस महासंचालक दत्तात्रय देविदास पडसलगीकर यांना पुन्हा एकदा तीन महिन्यांची मुदतवाढ राज्य शासनाने दिली असून ते येत्या फेब्रुवारीअखेरीस सेवानिवृत्त होतील. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या स्पर्धेत असलेले संजय बर्वे, परमबीर सिंग आदी आयपीएस अधिकाऱयांमध्ये निराशा पसरली आहे. त्यांना आपले ईप्सित साध्य होण्यासाठी आणखी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे.

दत्ता पडसलगीकर येत्या फेब्रुवारीअखेरीस सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी पोलीस महासंचालक म्हणून सुबोधकुमार जायसवाल यांची सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणून नियुक्ती होईल. तर मुंबईच्या आयुक्तपदी संजय बर्वे किंवा परमबीर सिंग यांची नियुक्ती होईल. मुंबईच्या आयुक्तपदाच्या शर्यतीत या दोन आयपीएस अधिकाऱयांचीच नावे आघाडीवर आहेत असे सांगितले जाते. दत्ता पडसलगीकर हे पोलीस दलात एक प्रामाणिक व सचोटीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. कामातही ते लवचिक असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुदतवाढीसाठी केंद्र शासनाकडे शिफारस केली होती.

पडसलगीकर हे गेल्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त झाले होते. तेव्हा शासनाने त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. नोव्हेंबरअखेरीस ही मुदत संपल्याने शासनाने त्यांना आणखी तीन महिने मुदतवाढ दिली आहे.