
एखाद्या गोष्टीची चीड आली पाहिजे. अर्थात ती गोष्ट मला का येत नाही याची ती चीड हवी. तशी चीड, तसा संताप जर येऊ लागला तर आणि तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल, असा गुरुमंत्र दुबईस्थित ‘मसालाकिंग’ डॉ. धनंजय दातार यांनी विद्यार्थी आणि नवउद्योजकांना दिला.
प्रबोधन कुर्ला शाळेच्या ‘धमाल मस्ती’ या ऑनलाइन संवाद मालिकेचे अखेरचे पुष्प गुंफताना डॉ. धनंजय दातार यांनी महाराष्ट्रातील एक दुर्गम खेडेगाव ते दुबई व्हाया मुंबई असा प्रवास सांगितला. दहावीत गणित विषयात पाच वेळा नापास झालेल्या दातार यांनी पुढे विक्री व्यवस्थापन या विषयात पीएचडी केली. अनेक सन्मान प्राप्त केले. त्यांची अल अदील ही कंपनी अरब राष्ट्रात आठव्या स्थानावर आहे. या प्रवासाचे मूळ संतापात आहे. गणिताशी जमले नाही तेव्हा चीड आली. त्यातूनच उद्योजक घडला आणि आज या मसाला व्यवसायातील मोठमोठे हिशेब सहजरीत्या करू लागलो, असे डॉ. दातार म्हणाले. मराठी माणसाचा जन्म फक्त नोकरी करण्यासाठी झाला आहे हा समज डोक्यातून काढून टाका, असेही दातार म्हणाले.
यावेळी लावणी सम्राज्ञी वर्षा संगमनेरकर यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. संस्थापक भाऊ कोरगावकर व शलाका कोरगावकर यांनी आभार मानले. विद्या फलके आणि शुभांगी मेमाणे यांनी सूत्रसंचालन केले.
या ऑनलाइन संवाद मालिकेत अभिनेते प्रशांत दामले, ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे, पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे, नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे, आवाज तज्ञ श्रीनिवास नार्वेकर, कवी डॉ. महेश केळुस्कर, बालनाटय़कार राजू तुलालवार, खडू शिल्पकार अशोक डोळसे आदींनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वर्गाशी संवाद साधला.


























































