धारावीची कोरोनाविरोधात आघाडी कायम, दुसऱया लाटेत आतापर्यंत 16 वेळा एकही रुग्ण नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रोखण्यात धारावीने आघाडी घेतली असून फेब्रुवारी मध्यापासून सुरू झालेल्या दुसऱया लाटेदरम्यान आज सोळाव्यांदा एकही रुग्ण सापडला नाही. धारावीबरोबर मध्य मुंबईतील वर्दळीचे भाग असणाऱया दादर आणि माहीममध्येही रुग्णसंख्या घटली असून दादरमध्ये आज 6 तर माहीममध्ये 8 रुग्ण सापडले.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि मुंबईतील सर्वात मोठी दाटीवाटीची वस्ती असलेल्या धारावीने कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणे दुसऱया लाटेवरही नियंत्रण मिळवले असून धारावीत आज सोळाव्यांदा एकही रुग्ण सापडला नाही. धारावीत या आधी 14, 15, 23 जून तर 4, 7, 17 जुलैला एकही रुग्ण सापडला नव्हता तर ऑगस्ट महिन्यात 3, 8, 11, 12, 15, 17, 18, 24, 27 तारखेला धारावीत एकही रुग्ण सापडला नव्हता.

लसीकरण पोहोचले लाखाच्या आसपास

धारावीत जसलोक रुग्णालय आणि सिटी बँकच्या माध्यमातून विशेष लसीकरणाची मोहीम राबवण्यात येत आहे. या विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 47 हजार 90 जणांचे तर पालिकेकडून 49 हजार 506 असे एकूण 96 हजार 596 जणांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती जी-उत्तरचे आरोग्य अधिकारी
डॉ. वीरेंद्र मोहिते यांनी दिली.

दादर, माहीममधील सक्रिय रुग्ण वाढले
कोरोनाच्या दुसऱया लाटेदरम्यान दादर आणि माहीममध्ये सक्रिय रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत होता. मात्र, आता दादर आणि माहीममध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. दादरमधील रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत असून सध्या 93 सक्रिय रुग्ण आहेत. माहीममध्येही सक्रिय रुग्णसंख्या काढली असून ती 123 वर पोहोचली आहे.