मला भविष्यातील योजनांत गृहीत धरू नका! धोनीच्या निवृत्तीची उरली फक्त औपचारिकता

40

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

तूर्तास मी निवृत्तीचा विचार केलेला नाही, पण बीसीसीआयच्या भविष्यातील योजनांत मला गृहीत धरू नका, असे मनोगत  राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्यासमोर व्यक्त करीत 350 वन डे क्रिकेट लढतींत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणारा टीम इंडियाचा माजी विश्वविजयी  कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या निवृत्तीत आता घोषणेची औपचारिकताच उरली असल्याचे उघड केली. धोनी आता कधीही आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील निवृत्तीसाठी मोकळा आहे असे प्रसाद यांनी धोनीशी झालेल्या चर्चेनंतर सांगितले.

टीम इंडियाला एक टी-20 विश्वचषक आणि एक 50-50 विश्वचषक अशी दोन विश्वविजेतीपदे पटकावून देणारा विश्वविजयी कर्णधार महेंद्रसिंह  धोनीच्या निवृत्तीबाबत क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्याला पूर्णविराम देणारे मतप्रदर्शन स्वतः धोनीनेच निवड समिती अध्यक्षांसमोर केल्याने आता टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटच्या यष्टिरक्षक पदासाठी युवा क्रिकेटर रिषभ पंतला संधी देण्यास बीसीसीआय मोकळी झाली आहे असे प्रसाद म्हणाले. युवा खेळाडूंना संधी मिळायला हवी असे दस्तुरखुद्द धोनीचेच मत असल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले.

‘माही’ महान खेळडू; निवृत्तीचा निर्णय त्याने स्वतःच घ्यायचाय-प्रसाद 

माही अर्थात महेंद्रसिंह धोनी हा हिंदुस्थानी क्रिकेटचा एक महान क्रिकेटर आहे. त्याने कधी निवृत्त व्हावे? हे बीसीसीआय सांगणार नाही. कारण अशा महान खेळाडूंना स्वतः कुठे थांबावे याची चांगलीच जाण असते. त्यामुळे धोनी स्वतःच्या निवृत्तीबाबत निर्णय घ्यायला सक्षम आणि सूज्ञ आहे, असेही प्रसाद यांनी पुढे स्पष्ट केले.

‘मी आताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेणार नाही, पण माझी मानसिक तयारी झाली की योग्य वेळी मी तो निर्णय जाहीर करीन. तूर्तास दोन महिने प्रादेशिक सेनेसाठी काम करण्याचा शब्द मी पाळतोय. बीसीसीआयने त्यांच्या भविष्यातील योजनांत मला गृहीत धरू नये. युवा खेळाडूंना संधी द्यायला बोर्ड मोकळा आहे.  – महेंद्रसिंह धोनी, टीम इंडियाचा माजी कर्णधार व यष्टिरक्षक

आपली प्रतिक्रिया द्या