आशा वर्कर्सच्या मदतीने लिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांचा शोध घेणार; आशा स्वयंसेविकेला 25 हजारांचे बक्षीस

612

स्त्रीजन्माचा दर वाढविण्यासाठी गर्भचिकित्सा थांबविणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे आता आशा वर्कर्सच्या मदतीने लिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांचा शोध घेतला जाणार आहे. गर्भलिंग तपासणाऱया डॉक्टरांवर गंभीर कारवाई होत असताना आशा स्वयंसेविकेला 25 हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. आशा स्वयंसेविकांनी या कामात मदत करावी, असे आवाहन महापालिकेतील उपायुक्त गणेश गिरी यांनी केले. महापालिका सभागृहात आशा स्वयंसेविकांसाठी कार्यशाळा झाली.

स्त्राrजन्माचा दर कमी होण्यास गर्भलिंग चिकित्सा हे प्रमुख कारण आहे. गर्भ मुलीचा असेल असे लक्षात येताच गर्भपात केला जातो. त्यामुळे मुलींच्या जन्माचा दर मोठय़ा प्रमाणात घसरला आहे. हजार पुरुषांमागे मुलींचा जन्मदर 825 च्या दरम्यान झाला आहे. त्यामुळे गर्भलिंग चिकित्सेला बंदी घालण्यात आली. असे असले तरी अनेक डॉक्टर गर्भलिंग चिकित्सा करून देतात आणि स्वतःचे उखळ पांढरे करतात. तर अनेक डॉक्टर स्त्राrचा गर्भ असेल तर तो काढून टाकण्यासाठी भरभक्कम पैसे घेतात. डॉक्टरांच्या या बेकायदेशीर व्यवसायाचा समाजावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने शहरात गर्भलिंग चिकित्सा करणाऱया डॉक्टरांचा बीमोड करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका सभागृहात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांसह आशा स्वयंसेविकेसाठी कार्यशाळा झाली. यावेळी उपायुक्त गणेश गिरी यांच्यासह महिला बालकल्याण समितीच्या सभापती निशा पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. महेश मोरे, सल्लागार समितीच्या सदस्या मोनिका शिंपी, डॉ. चंद्रकला मोरे, डॉ. कल्पना मोरे उपस्थित होते.

यावेळी उपायुक्त गणेश गिरी म्हणाले, शासनाने गर्भलिंग चिकित्सेला बंदी घातली आहे, पण तरीही डॉक्टरांकडून गर्भलिंग तपासणी होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता आशा स्वयंसेविकांनी गर्भलिंग चिकित्सा करणाऱया डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी मदत करावी. गर्भलिंग निदान करून देत असेल तर त्या डॉक्टरांवर गंभीर स्वरूपाची कारवाई होईल, पण त्याचवेळी डॉक्टरांचे कारनामे उघडकीस आणण्यासाठी मदत करणाऱया आशा स्वयंसेविकांना 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे गणेश गिरी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या