आहाराच्या सवयी बदलल्या, 81 टक्के लोकांची एकवेळच्या जेवणासाठी स्नॅक्सला पसंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन वेळेला पौष्टिक, सकस आहार घेणे आरोग्यासाठी गरजेचे असते. मात्र देशातील अनेक लोक स्नॅक खाऊन पोट भरतात. 81 टक्के लोक दिवसातून किमान एक वेळचे जेवण टाळून स्नॅक्स खातात, असे ‘स्टेट ऑफ स्नॅकिंग’च्या अहवालाची आकडेवारी सांगते. 10 पैकी 8 लोक रोज एक वेळच्या जेवणाऐवजी स्नॅक्सला पसंती देतात, असे दिसून आले आहे.

अनेक जण सायंकाळच्या वेळी स्नॅक्स खातात. चव, आवड आणि सोय बघून पौष्टिक आहाराऐवजी असे खाद्यपदार्थ खातात. सर्व्हेमध्ये सहभागी 76 टक्के प्रौढांनी सांगितलं की गोड खाल्ल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही. चॉकलेटबाबत 78 टक्के हिंदुस्थानींचे हेच मत आहे. कोरोना महामारीच्या काळात स्नॅक्सकडे लोकांचा ओढा वाढला. लोक वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स खात आहेत. नवीनवीन स्नॅक्सला पसंती देत असल्याचे 90 टक्के लोकांनी सांगितले.

सोशल मीडियाचा प्रभाव
92 टक्के लोकांनी सोशल मीडियातील फूड कंटेंट पाहणे पसंत करत असल्याचे सांगितले. जागतिक स्तरावर हे प्रमाण 62 टक्के आहे. 77 टक्के लोकांनी मान्य केलंय की सोशल मीडियावरून प्रेरित होऊन त्यांनी वर्षभरात किमान एक नवा स्नॅक्स खाल्ला आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण 55 टक्के आहे.