कोरोना आणि फ्लूमध्ये आहे ‘हा’ फरक…जाणून घ्या….

कोरोना व्हायरस आणि फ्लूचे संक्रमण झाल्यास नेमके कोणत्या रोगाचे संक्रमण झाले आहे, याचे निदान चाचणी केल्याशिवाय करणे कठीण असते. दोन्ही रोगांची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे या बाबतचे निदान करणे कठीण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. काहीवेळा दोन्ही रोगांचे संक्रमण एकाचवेळी झाल्यास त्याचे निदान करणेही कठीण असते. त्यामुळे या दोघांची लक्षणे सारखीच असली तरी त्यात असलेल्या काही फरकामुळे नेमका अंदाज बांधण्यास मदत होते, असे काही वैज्ञानिकांनी सांगितले.

अंगदुखी, घशात खवखव, ताप, खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास, थकवा जाणवणे आणि डोकेदुखी ही सर्व लक्षणे कोरोना आणि फ्लू या रोगांचे संक्रमण झाल्यास दिसून येतात. मात्र, या लक्षणांमध्ये असलेल्या काही फरकांमुळे दोन्ही संक्रमण ओळखता येतात, असा दावा काही वैज्ञानिकांनी केला आहे. फ्लूचे संक्रमण झाल्यास व्यक्तीमध्ये आठवड्याभरात लक्षणे दिसून आजार बळावतो. तर कोरोना संक्रमणाची लक्षणे उशिरा दिसून येतात आणि कोरोनामुळे तीन आठवड्यांपर्यंत व्यक्ती आजारी असतो. तर काही वेळी तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ कोरोनातून बरे होण्यास लागतो. हा या दोघांमधला मोठा फरक असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.

कोरोनाचे संक्रमण झाल्यास व्यक्तीला गंध येत नाही आणि चवही समजत नाही. हे लक्षण फक्त कोरोनामध्ये आढळते. फ्लूमध्ये हे लक्षण दिसत नाही. त्यामुळे या फरकामुळेही दोघांपैकी नेमके कसले संक्रमण आहे, ते ओळखणे सोपे जाते. मात्र, काही कोरोनाच्या रुग्णांमध्ये कोणतीच लक्षणे आढळून येत नाहीत. अशा रुग्णांचे निदान करणे कठीण असते. एकाचवेळी दोन्ही रोगांचे संक्रमण झाल्यास परिस्थिती अधिक बिकट होते. अशा परिस्थितीत दुपटीने धोका वाढतो. त्यामुळे दोन्ही रोगांच्या चाचण्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे बॉस्टनच्या हॉवर्ड मेडिकल हॉस्पिटल आणि स्कूलचे डॉ. डेनियल सोलोमन यांनी सांगितले. आपल्या परिसरात कोणत्या रोगाचा फैलाव जास्त आहे किंवा आपण कोणाच्या संपर्कात आलो होतो, यावरूनही संक्रमणाबाबतच्या निदानाला मदत होऊ शकते.

फ्लूचा सामाजिक संसर्ग होत नसल्याने त्याच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत नाही. दोन्ही रोग व्यक्तीला आजारी करण्याआधी संक्रमित करतात. दोन्ही रोग शिंकावाटे पसरतात. फ्लूचे संक्रमण झाल्यावर व्यक्ती चार दिवसात आजारी पडतो. तर कोरोनाची लक्षणे दिसण्यास 2 ते 14 दिवस लागतात. तसेच फ्लूचे संक्रमण झाल्यास व्हायरसच्या प्रकारानुसार औषधोपचार करण्यात येतात. तर कोरोनावर अजूनही प्रभावी लस उपलब्ध झालेली नाही. जगभरात यावर संशोधन सुरू आहे. त्यामुळे काही फरक लक्षात घेऊन दोन्हीमधील फरक समसजल्यास औषधोपचारास मदत होऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या