सागरतळ ते अंतराळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

[email protected]

काही व्यक्तींचा जीवन प्रवास मोठा विलक्षण असतो. आवडत्या विषयाचा अभ्यास करून त्यात त्यांना प्रावीण्य मिळविता येतं आणि कर्तृत्वाच्या एखाद्या वेगळ्याच ‘प्रांतात’ साहस करण्याचीही संधी मिळते.

अमेरिकन अंतराळयात्री कॅथरिन स्युलिवान यांच्या बाबतीत असं घडलं. १९५१ मध्ये न्यू जर्सी राज्यात जन्मलेल्या कॅथरिनचं शिक्षण झालं ते तिच्या पसंतीनुसार भूगर्भशास्त्र  आणि ‘अर्थ सायन्स’ या विषयात पदवी प्राप्त करून. कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदवी घेतल्यावर कॅथरिन यांनी डलहौसी विद्यापीठातून भूगर्भशास्त्रात डॉक्टरेट (पीएच.डी.) मिळविली. त्यातही ऍटलाण्टिक आणि पॅसिफिक महासागरांमध्ये साहसी संशोधन करण्याची संधी त्यांनी सोडली नाही.

पृथ्वीच्या थेट ‘तळाशी’ जाऊन भूगर्भीय संशोधन करणाऱ्या कॅथरिनला अंतराळात उड्डाण करण्याचं स्वप्न पडलं असेल का? ठाऊक नाही, पण सागर संशोधक (ओशनोग्राफर) म्हणून कार्यरत असताना नोकरीपेक्षा वेगळ्या क्षेत्रात अधिक काही करण्याची ऊर्मी जागृत होऊन तिने एकदम ‘नासा’च्या अंतराळ कार्यक्रमासाठी नाव नोंदवलं. सागरतळाचा शोध घेऊन आलेली ही उत्साही तरुणी बघता बघता त्यातही पारंगत झाली आणि १९८४ मध्ये ‘चॅलेंजर’ या अंतराळयानातील एक अंतराळयात्री म्हणून तिची निवड झाली. या प्रकल्पाचे तज्ञ डेव्हिड लिस्टमा यांच्यासह यानाबाहेर साडेतीन तास ‘स्पेसवॉक’ करण्याचा थरारक अनुभव तिने घेतला. या काळात उपग्रहाच्या इंधनाचं अंतराळातच पुनर्भरण (रिफ्युएल) कसं करता येतं ते या दोघांनी दाखवून दिलं. याच मोहिमेत त्यांनी एक उपग्रहसुद्धा अवकाशस्थ केला. अंतराळात १९७ तास घालवून आणि पृथ्वीभोवती १३२ परिक्रमा करून कॅथरिन पृथ्वीवर परतल्या.

कॅथरिनच्या कामगिरीचं कौतुक तर झालंच, पण १९९० मध्ये पाच दिवसांच्या ‘डिस्कव्हरी’ उड्डाणासाठी निवडही झाली. यावेळी या यानाच्या पथकावर (क्रू मेंबर्सवर) मोठी जबाबदारी होती ती ‘हबल’ नावाची महत्त्वाकांक्षी अंतराळ दुर्बिण योग्य रीतीने अवकाशस्थ करण्याची ते काम सुरळीतपणे पार पडलं. तेव्हापासून अंतराळात भिरभिरत असलेला आणि एडविन हबल या वैज्ञानिकाचं नाव अमर करणारा माणसाचा हा ‘तिसरा डोळा’ अव्याहतपणे जगाचा धांडोळा घेत आहे. आतापर्यंत ‘हबल दुर्बिणी’ने अंतराळातील दूरस्थ वस्तूंचे लाखो फोटो पाठवले आहेत. खगोल अभ्यासकांना ते नेहमीच उपयुक्त ठरतात.

‘डिस्कव्हरी’च्या याच ‘मिशन’मध्ये कॅथरिनच्या पथकाकडे जी कामं होती त्यामध्ये अंतराळात प्रथिनांच्या स्फटिकांची (प्रोटिन क्रिस्टल) वाढ कशी होते आणि पॉलिमर मेंब्रेन प्रक्रिया असे काही विशेष वैज्ञानिक प्रयोगही सोपविण्यात आले होते. उद्या चंद्र किंवा मंगळावर वस्ती करायची, पृथ्वीच्या कक्षेपलीकडच्या अंतराळाची नीट ‘ओळख’ व्हावी असा या प्रयोगामागचा हेतू असतो. अंतराळात पिकं घेता येतील का किंवा विविध धातूंची जुळणी कशी होईल असे अनेक मुद्दे असतात. पृथ्वीवर एखादी वस्तू जड वाटते. कारण त्यावर कार्य करणारं गुरुत्वाकर्षणाचं बल. तीच वस्तू अंतराळात वजनशून्य होते. या वजनरहित अवस्थेत ‘जड’ वस्तूंवर इथे न करता येणारी काही प्रक्रिया शक्य आहे का वगैरे गोष्टींचा साकल्याने अभ्यास केला जातो.

तर ‘डिस्कव्हरी’च्या ट्रिपमध्ये पृथ्वीभोवती ७६ परिक्रमा करून आणि १२१ तास यशस्वीरीत्या काम करून कॅथरिन पृथ्वीवर आल्या. त्यानंतर ‘नासा’च्या स्पेसलॅब प्रकल्पात त्यांनी ‘पे-लोड कमांडर’ म्हणून त्यांनी काम केलं. ‘पे-लोड’ म्हणजे रॉकेटवरून अंतराळात उपग्रह सोडताना लागणाऱ्या वजनाचं गणित मांडून त्याचा अभ्यास त्यांनी केला.

अशा अनेक अंतराळ प्रकल्पांत कार्यरत असताना कॅथरिन यांना अंतराळात एकूण २२ दिवस ४ तास आणि ४० मिनिटे भ्रमण करण्याची संधी मिळाली. त्याबद्दलची पावती म्हणून त्यांची वॉशिंग्टनच्या स्मिथसॉनियन संस्थेच्या ‘एअर ऍण्ड स्पेस म्युझियम’ विभागात मानद नियुक्ती करण्यात आली. सागरतळ ते अंतराळ असा थक्क करणारा अनुभव घेता आल्याचं समाधान त्यांना नक्कीच लाभलं असेल.