दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर, लवकरच डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, असे आश्वासन डॉक्टरांनी आपल्याला दिल्याची माहिती दिलीप कुमार यांच्या पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी ट्विटरवरून दिली आहे. सोबतच दिलीप कुमार यांच्यासोबतचा एक फोटोदेखील त्यांनी शेअर केला आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अभिनेते दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरून सायंकाळी सायरा बानो यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, ‘‘गेल्या काही दिवसांपासून माझे पती युसूफ खान (दिलीप कुमार) यांची प्रकृती ठीक नाही. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱया सर्व चाहत्यांचे, हितचिंतकांचे मी आभार मानते.’’ पुढे त्यांनी म्हटलंय, ‘‘माझे पती, माझे कोहिनूर, आपले दिलीप कुमार यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल, असे आश्वासन मला डॉक्टरांनी दिले आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा.’’

श्वसनाचा त्रास होत असल्याने दिलीप कुमार यांना रविवारी सकाळी खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या फुप्फुसात पाणी जमा झाल्याचे रविवारी रात्री निदान झाले होते.

ऑक्सिजन सपोर्टवर सुरू आहेत उपचार

दरम्यान, सोमवारी दुपारीदेखील एका ट्विटद्वारे दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. ‘‘दिलीप कुमार
सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत, व्हेंटिलेटरवर नाही. त्यांची प्रकृती स्थिर आहे. काही चाचण्यांच्या रिपोर्टची वाट पाहिली जात आहे. डॉ. जलील पारकर हे त्यांच्यावर उपचार करत आहेत.’ असे ट्विटमध्ये म्हटले होते.