
जुन्नर, आंबेगाव, शिरूरसह श्रीगोंदा, करमाळा तालुक्यांना वरदान ठरलेले घोड नदीवरील डिंभा व मीना नदीवरील वडज ही दोन्ही धरणे 100 टक्के भरली आहेत. सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या डिंभा धरणातून घोडनदीत 3 हजार तर वडज धरणातून मीना नदीत 1 हजार क्यूसेसने पाणी सोडण्यात आल्याची माहिती कुकडी पाटबंधारे धरण विभागाचे शाखा अभियंता तानाजी चिखले यांनी दिली.
भीमाशंकर,आहुपे खोऱ्यात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने दक्षता म्हणून धरणातून घोड नदी पात्रात सांडव्यावरून सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास 3 हजार कुसेक्यने पाणी सोडण्यात आले आहे. धरणात आवक होत जमा होत असलेल्या पाण्यावर नदी पात्रात सोडण्यात येणारा विसर्ग कमी जास्त होणार आहे. धरणातून नदी पात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये व नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ही कुकडी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. डिंभा, वडज धरणे पूर्ण भरल्याने शिरूर तालुक्यातील घोड धरणात पाण्याची मोठीच आवक होणार असून डिंभा,वडज धरणे पूर्ण भरल्याने आंबेगाव,शिरूर,श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.






























































