
लग्न करायला नकार दिला म्हणून प्रसिद्ध इराणी दिग्दर्शक बबाक खोराम्मदीन यांची निर्घृण हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या त्यांच्या आईवडिलांनीच केल्याची उघड झाली आहे.
बबाक खोराम्मदीन (47) यांचे अनेक वर्षे इंग्लंड येथे वास्तव्य होते. लहान मुलांवरील एका फिल्मकरिता प्रशिक्षण देण्याकरिता ते इराणला त्यांच्या आईवडिलांकडे आले होते. तेव्हा त्यांचे आणि त्यांच्या आईवडिलांचे त्यांच्या लग्नावरून वाद झाले. त्यांचे लग्न व्हावे अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती, पण बबाक लग्नाला नकार देत असल्यामुळे अखेर सामाजिक प्रतिष्ठेकरिता त्यांच्या पालकांनीच त्यांना ठार केले.
त्यांची हत्या करण्यापूर्वी कॉफीमधून गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे केले. ते कचऱ्याच्या पिशवीत भरले. ही पिशवी पोलिसांच्या हाती लागली आणि पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. चौकशीअंती बबाक यांच्या आई-वडिलांनी आपला गुन्हा मान्य केला.
बबाक अविवाहित होते. त्याला आम्ही वारंवार लग्न करण्याबाबत विचारायचो पण तो आमचे म्हणणे ऐकायला तयार नव्हता. यामुळे आम्हाला मानसिक त्रास होत होता आणि याचा परिणाम आमच्या सामाजिक प्रतिष्ठेवरही होत होता. घराबाहेर पडू नये असे वाटायचे. त्यामुळे मी आणि त्याच्या आईने आमच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागू नये याकरिता त्याला जीवे मारून टाकायचे असे ठरवले. याचा आम्हाला अजिबात पश्चाताप होत नाही, असा दावा बबाक यांच्या वडिलांनी न्यायालयाकडे केला आहे, अशी माहिती तेहरान क्रिमिनल न्यायालयाचे प्रमुख मोहम्मद शहरयार यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिग्दर्शक बबाक खोराम्मदीन यांच्या पालकांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत. बबाक यांनी 2009 साली फॅकल्टी ऑफ फाईऩ आर्टस् ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ तेहरान इथून मास्टर्स डिग्री प्राप्त केली होती. त्यानंतर त्यांनी काही शॉर्ट फिल्म्सही तयार केल्या होत्या. चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.



























































