पुर्ववैमनस्यातून दोन गटात राडा; दत्तवाडी पोलिसांकडून सहा जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुर्ववैमनस्यातून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री सिंहगड रस्त्यावरील महालक्ष्मी अपार्टमेंट आणि सिद्धार्थ कंपनीजवऴील परिसरात घडली. यामध्ये एकजण जखमी झाला असून आरोपींनी हातातील लोखंडी कोयते फिरवत दहशत पसरविली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करून दोन्ही गटातील सहा जणांना अटक केली आहे. तर, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.

रोहीत इश्वर खडके (23, रा. महालक्ष्मी अपार्टमेंट, सिंहगड रस्ता) याने दिलेल्या तक्रारीनुसार राम बनसोडे, वैभव गोरड, अविनाश मिसाळ, गणेश जोरकर, कृष्णा वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील गोरड, मिसाळ, वाघमारे, बनसोडे यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जून्या वादातून तक्रारदार खडके यांना मारहाण केली. आरोपी जोरकर याने हातातील हत्याराने खडकेवर वार केला. यात तो जखमी झाला आहे. मारहाणीनंतर आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवत येथील वाहने तसेच अपार्टमेंटमधील दरवाजांवर कोयत्याने तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून काही जणांना अटक केली. तर, सपना सुरेश म्हस्के (36, रा. सिद्धार्थ कंपनीजवळ, सिंहगड रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रोहीत खडके, समीर हातांगळे, आकाश म्हस्के, ओकार ओव्हाळ, मयुर पालखे यांच्यासह सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील ओंकार आणि आकाश या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, अल्वयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार राहत असलेल्या गल्लीमध्ये येत आरोपींनी म्हस्के यांच्या दरवाजावर कोयत्याने मारले. याचा जाब विचारला असता तुला संपवून टाकतो, असे म्हणत हातातील लोखंडी कोयत्याने वार केला. मात्र, तक्रारदाराने तो चुकवला. त्यानंतर धमकी देत आरोपी निघून गेले. घटनेची माहिती मिळताच दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरू केला. या दरम्यान आरोपी हे सिंहगड रस्त्यावरील पानमळा भागात असल्याची माहिती अंमलदार कुंदन शिंदे, प्रशांत शिंदे, नवनाथ भोसले यांच्या पथकाला मिळाली होती. यानूसार पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. उर्वरीत आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास दत्तवाडी पोलीस करीत आहेत.