प्रदूषणमुक्त प्रवासाला सुरुवात, दिव्यापासून रत्नागिरीपर्यंत विजेवर धावली दिवा-सावंतवाडी पॅसेंजर

कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीपर्यंत प्रदूषणमुक्त प्रवासाचं पर्व सुरु झाले आहे. विद्युत इंजिनवर चालणारी पहिली पॅसेंजर गाडी गुरुवारी धावली. हा मान दिवा- रत्नागिरी- सावंतवाडी पॅसेंजर गाडीला मिळाला. दिवा ते रत्नागिरीपर्यंत ही गाडी विद्युत इंजिनासह धावली. पुढे मात्र तिचा प्रवास डिझेल इंजिनने झाला.

गेल्या वर्षी रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यापासून रत्नागिरीपर्यंत केवळ मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात होत्या. गुरुवारी दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनसह धावली. इलेक्ट्रिक लोकोसह धावणारी पहिली गाडी रात्री रत्नागिरी स्थानकावर आली. विजेवर धावणाऱ्या पहिल्या पॅसेंजर गाडीचे कोकण रेल्वेच्या हद्दीत कोकण रेल्वेकडून स्वागत करण्यात आले. दिवा येथून प्रवाशांना घेऊन आलेली चाचणी यशस्वी झाली. विशेष म्हणजे विद्युत इंजिनवर चालणारी पहिली गाडी चालवण्याचा पहिला मान रत्नागिरीतील सुपुत्रांना मिळाला. गाडीचा लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट तसेच गार्ड हे तिघेही रत्नागिरीचे सुपुत्र आहेत. दिवा ते रत्नागिरी दरम्यान धावणारी ही गाडी आता रोज इलेक्ट्रिक लोकोसह धावणार आहे.

दरम्यान, रत्नागिरी-वेर्णा मार्गावरील टनेलमधील विद्युत यंत्रणा तपासली जात आहे. रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही पुढे मडगावकडे नेण्यात येते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. 12 जानेवारीला रत्नागिरी ते वेर्णा मार्गावर विद्युत इंजिनाची ट्रेन चालवण्याची दुसरी चाचणी घेण्यात आली होती. यामधील त्रुटी दूर करण्याचे काम येत्या काही दिवसात पूर्ण केलं जाणार आहे. टप्प्याटप्प्याने कोकण रेल्वेमार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण केलं जाणार आहे.