दिव्यात शिक्षिकेची पाचवीच्या विद्यार्थिनीला बेदम मारहाण, शिवसेनेच्या दणक्यानंतर लेखी माफीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरगुती शिकवणीसाठी पोहोचण्यास उशीर झाला म्हणून शिक्षिकेने पाचवीच्या विद्यार्थिनीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. श्रावणी चव्हाण असे या शिक्षिकेचे नाव असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱयांनी जाब विचारताच या शिक्षिकेने चूक झाल्याची कबुली दिली व यापुढे कोणत्याही विद्यार्थ्याशी चुकीच्या पद्धतीने वागणार नाही, असे सांगत लेखी माफीनामा दिला.

दिव्यात राहणारी रश्मी सावंत ही पाचवीची विद्यार्थिनी घरगुती शिकवणीसाठी श्रावणी चव्हाण यांच्याकडे जाते. शुक्रवारी रश्मीला शिकवणीसाठी पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे श्रावणी चव्हाण यांनी रश्मीला पट्टीने बेदम मारहाण केली. रश्मीच्या पालकांनी ही बाब शाखाप्रमुख राज कदम यांना सांगितली. त्यानंतर दिवा उपशहरप्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाखाप्रमुख राज कदम, उपशहर संघटक प्रियंका सावंत, उपविभाग संघटक विनया कदम, दीपाली सावंत, सावी सुर्वे, आशा रोकडे, सुजाता मोरे, शिवसैनिक नितीन सावंत, असिम गुप्ता यांनी श्रावणी चव्हाण यांच्या घरी धडक देत त्यांना जाब विचारला. शिवसैनिकांनी चव्हाण यांना पोलिसांसमोर उभे केले असता एपीआय शेळके यांनी चव्हाण यांना कडक शब्दात समज दिली.