‘गौमूत्र’ राज्यांत भाजपचा विजय! डीएमके खासदाराच्या विधानानं संसदेत गोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
DMK MP Senthil Kumar

द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) खासदार डीएनव्ही सेंथिलकुमार एस यांनी मंगळवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले.

भाजपवर ताशेरे ओढत खासदार सेंथिलकुमार एस म्हणाले, ‘भाजपची ताकद मुख्यत: हिंदी भाषिक राज्यांमध्ये किंवा ज्यांना आपण ‘गौमूत्र राज्य’ म्हणतो, निवडणुका जिंकण्यात आहे. तुम्ही दक्षिण भारतात येऊ शकत नाही’.

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने मोठा विजय मिळवल्यानंतर मंगळवारी सभागृहात सेंथिलकुमार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भाजपनं या विधानावरून संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार अन्नपूर्णा देवी म्हणाल्या, ‘राज्यातील जनतेने भाजपला मतदान केले आहे आणि त्यांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे… अशी विधाने करणाऱ्या लोकांची मानसिकता उथळ आहे आणि त्यांना पंतप्रधान मोदींच्या जगभरातील लोकप्रियतेवर ते जळतात’.

भाजपचे खासदार जगन्नाथ सरकार यांनीही सेंथिलकुमार यांच्या या वक्तव्यावर टीका केली आणि ते म्हणाले, ‘भाजपला देशभरात स्वीकारले जाते. ज्यांना काहीच माहिती नाही, ते अशी विधानं करत आहेत’. तसेच ‘सेंथिलकुमार यांना हिंदुस्थानची संस्कृती माहित नाही’, असा टोलाही सरकार यांनी लगावला आहे.

‘त्यांना हिंदुस्थानची संस्कृती माहिती नाही, परंतु आम्हा सर्वांना माहित आहे की लोकांचा भाजपवर विश्वास आहे आणि पंतप्रधान मोदी हे केवळ हिंदुस्थानचे नेते नाहीत, तर ते जागतिक नेते बनले आहेत’, असा दावा देखील सरकार यांनी यावेळी केला.