
>> डॉ. ज्योती धर्माधिकारी
सारा यांना 21 मार्च 2015 या दिवशी राष्ट्राध्यक्ष हेज गोइंगोब यांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानपदाची सूत्रे सोपवण्यात आली. सारासारख्या अभ्यासू, धडाडीच्या, महत्त्वाकांक्षी आणि देशभक्त स्त्रीकडे पंतप्रधानपद असणे हे देशाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरते. देशाला दारिद्रय़ाच्या खाईतून बाहेर काढून विकासाच्या महामार्गावर नेऊन सोडण्याचे महत्त्वपूर्ण काम सारा यांच्याकडे आहे.
सध्याच्या नामिबियन पंतप्रधान सारा कुएनगोगेला अमेढेला यांचा जन्म तेव्हाचा नैऋत्य आफ्रिका आणि आताचा नामिबिया येथील ओटामांजी येथे 12 ऑक्टोबर 1967 या दिवशी झाला. वयाच्या 13 व्या वर्षी त्या नैऋत्य आफ्रिकन संघटनेची सदस्य होण्यासाठी घराच्या बाहेर पडल्या. किशोर वयापासून त्या राजकारणात आल्या तरीही शिक्षणाकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. लिंकन युनिव्हर्सिटी, पॅन सिल्व्हानिया, अमेरिका येथे वित्त अर्थशास्त्र या विषयात त्यांनी एम. एससी. पदव्युत्तर पदवी मिळवली. पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या 1994 मध्ये आपल्या मायदेशी नामिबियाला परतल्या. त्यावेळी नामिबियामध्ये सॅम न्युजोमा हे राष्ट्राध्यक्ष होते.
राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात अगदी काहीच महिने त्यांनी अर्थतज्ञ म्हणून काम केले. लगेच काही महिन्यांत त्यांना संसदेमध्ये जाऊन बसण्याची संधी मिळाली. राष्ट्राध्यक्ष न्युजोमा यांनी त्यांना मंत्रीपदाचे समकक्ष असलेले राष्ट्रीय नियोजन समितीचे संचालक बनवले. 1995 पासून 2003 पर्यंत सारा या पदावर कार्यरत होत्या. 2003 मध्ये त्यांची बढती झाली. सार्वत्रिक निवडणूक जिंकून आल्यानंतर त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद हे देशाच्या विकासाला गती देणारे खाते सोपवण्यात आले. खरं तर अर्थमंत्री असताना सारा यांना देशातील समस्या समजल्या होत्या. येथील लोकसंख्या ही फार सुशिक्षित आणि प्रगत लोकसंख्या म्हणता येणार नाही. बहुतांश लोक खाणकाम करून आपला उदरनिर्वाह करतात किंवा शेती हा जोडधंदा आहे. अशा परिस्थितीमध्ये अर्थवृद्धीचे कोणतेही पर्याय येथील कुटुंबाकडे उपलब्ध नाहीत याची जाणीव सारा यांना होती.
सारा यांना 21 मार्च 2015 या दिवशी राष्ट्राध्यक्ष हेज गोइंगोब यांच्या मंत्रिमंडळात पंतप्रधानपदाची सूत्रे सोपवण्यात आली. सारासारख्या अभ्यासू, धडाडीच्या, महत्त्वाकांक्षी आणि देशभक्त स्त्राrकडे पंतप्रधानपद असणे हे देशाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरते. सारा यांची डॉक्टरेट पदवीदेखील ’सार्वजनिक वित्त’ या विषयात आहे. नामिबिया 1990 मध्ये स्वतंत्र झाला. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात या देशाचा 34 वा क्रमांक लागतो तर लोकसंख्या अत्यंत अल्प आहे. आफ्रिकन देश असल्यामुळे साहजिकच देशामध्ये उत्पन्नाचे माध्यम अत्यंत कमी आहे. अन्नधान्याचा तुटवडा आहे, मोठय़ा प्रमाणात बेरोजगारी आहे. देशाचे परराष्ट्र धोरणही आतापर्यंत अतिशय कमकुवत असे होते. देशामध्ये अर्थनिर्मिती करणारे रोजगार, कार्यालय, उद्योगधंदे अत्यल्प प्रमाणात आहेत. नामिबियाने संयुक्त राष्ट्र संघामध्ये 1990 मध्ये प्रवेश मिळवला. त्यामुळे शांती आणि कायदा प्रस्थापित करताना त्यांना मदत होऊ शकते, परंतु रोजगार निर्मितीसाठी आणि उच्च शिक्षणासाठी मात्र नामिबियाच्या तरुणांना झगडावे लागते. अशा परिस्थितीमध्ये देशाच्या चौथ्या आणि पहिल्या महिला पंतप्रधान सारा यांच्यापुढे अनेक समस्या उभे आहेत.
देशाला दारिद्रय़ाच्या खाईतून बाहेर काढून विकासाच्या महामार्गावर नेऊन सोडण्याचे महत्त्वपूर्ण काम सारा यांच्याकडे आहे. पंतप्रधान म्हणून त्यांची सर्व जबाबदारी त्या नेटाने पार पाडत असतात. आज वयाच्या 55 व्या वर्षी सारा यांची सुधारणावादी मते देशाला नक्कीच भाग्योदय दाखवतील. येथील तरुणांच्या, विशेषत: मुलींचा शिक्षणाबद्दल आणि त्यांच्या अधिकाराबद्दल त्या अत्यंत जागरूक आहेत. त्याच वेळी उच्च शिक्षणाचा खर्च नामिबियन तरुणांना परवडणारा नाही. सार्वजनिक सोयीसुविधादेखील ऐपतीच्या बाहेर आहेत. अशा वेळी रोजगार निर्मिती हा एकमेव पर्याय सारा यांच्याकडे आहे. नुकताच नामिबियाने चीन आणि अमेरिका यांच्यासोबत व्यावसायिक करार करून नामिबियन तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. या व्यवसाय करारामध्ये देशाचा अन्नधान्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेती अत्यल्प पिकत असल्यामुळे नामिबिया या देशामध्ये भूकबळींची संख्या अधिक आहे. त्यावर उपाय म्हणून चीन आणि अमेरिकेसारख्या देशांतून मांस आणि अन्नधान्याची आवक वाढवली. सारा यांनी एक नवीन आयोग सुरू करून बंद पडलेल्या उद्योगधंद्यांना पुनरुज्जीवन देण्याची संधी निर्माण केली. तरुणांना प्रोत्साहन दिले आहे की, तरुणांनी पुढे यावे. नवीन उद्योग सुरू करावेत. प्रशासकीय कामातही सारा यांचा उल्लेख एक आदर्श प्रशासकीय अधिकारी म्हणून केला जातो.
खरंतर ’ई-गव्हर्नन्स’ 2018 पासूनच सुरू झालं. त्यामुळे अनेक सुविधा या ऑनलाइन प्राप्त करता येतात. तरीही कार्यालयातील कामेही तत्परतेने व्हावीत याबद्दल सारा अत्यंत दक्ष आहेत. त्यांच्या कामामुळे 2014 मध्ये त्यांना देशातला दुसरा महत्त्वाचा पुरस्कार ’देदीप्यमान सूर्य’ (द मोस्ट ब्रिलियंट ऑर्डर ऑफ द सन) देऊन पुरस्कृत करण्यात आले. 10 व्या नामिबियन महिला शिखर परिषदेमध्ये त्यांनी नामिबियन महिलांच्या हक्क आणि अधिकारांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. देशामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने येण्यासाठी कमीत कमी आणखी 70 वर्षे लागू शकतील असे खेदाने त्या म्हणाल्या.
सारा यांना त्यांच्या कार्यामध्ये हल्लीच अनेक देशांचे सहकार्य मिळत आहे. एक तज्ञ, संवेदनशील, धडाडीच्या कार्यकर्त्या स्त्रीकडे जेव्हा देशाची पंतप्रधानपदाची सूत्रे येतात तेव्हा देश प्रगतीपथावर घोडदौड करू लागतो याचे ताजे उदाहरण नामिबिया हा देश आहे.
[email protected]
(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख आहेत)




























































