
सामना ऑनलाईन, मुंबई
सध्या शाळांमध्ये चाचणी परीक्षा सुरू असून या काळात स्कूलबसेसवर पॅनिक बटण, व्हेईकल ट्रकिंग सिस्टीम (व्हीटीपी) बसवण्याची सक्ती आरटीओने करू नये अशी मागणी स्कूलबस ओनर्स असोसिएशनने केली आहे. सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी स्कूलबसेसना फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असून या प्रमाणपत्रासाठी उन्हाळी सुट्टीपर्यंत स्कूलबस मालकांना मुदत हवी आहे.
ज्या स्कूलबसेसमध्ये पॅनिक बटण आणि व्हीटीपी यंत्रणा नाही अशा बसेसना आरटीओकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळत नाही. बसेसना फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे स्कूलबस ओनर्स असोसिएशनने मान्य केले आहे, पण ते घेण्यासाठी किमान दोन दिवस स्कूलबस बंद ठेवावी लागेल. शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांची गैरसोय करता येणार नाही असे बसमालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांना मे महिन्यापर्यंत मुदत हवी आहे.
केंद्राच्या आदेशाची अंमलबजावणी कधी?
आरटीओ सध्या पॅनिक बटण, व्हेईकल ट्रकिंग सिस्टीमची तपासणी करीत आहे पण सप्टेंबर 2016 रोजी आलेल्या सेंट्रल मोटार वाहन ऍक्टची अंमलबजावणी कधी करणार, असा सवाल स्कूलबस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी केला आहे. या कायद्यानुसार 13 पेक्षा कमी आसनक्षमता असलेल्या वाहनांमधून विद्यार्थी वाहतूक करण्यास बंदी आहे. पण या कायद्याची अद्याप अंमलबजावणीच झालेली नाही, असे गर्ग म्हणाले.
स्कूलबस पर्यायी व्यवस्था देणार नाही
मंगळवारी (8 जानेवारी) बेस्ट बसेसचा संप आहे. या संपकाळात स्कूलबसेस पर्यायी वाहतुकीसाठी कोणतेही सहकार्य करणार नाही असा इशाराही अनिल गर्ग यांनी दिला आहे.






























































