आमच्याकडे बहुमत नाही, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकामागोमाग एक भूकंप होत आहे. मंगळवारी सुप्रीम कोर्टाने भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 तासांचा अवधी दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षांना धक्का बसला आहे. आता रिपाईचे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला असून आमच्याकडे बहुमत नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार अजित पवार यांच्यासोबत आले तरच आम्ही बहुमताचा आकडा गाठू शकतो असे म्हटले आहे.

‘इंडिया टुड’ने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी विश्वासदर्शक ठराव विधानसभेमध्ये मांडला जाणार आहे. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, आमच्याकडे सध्या बहुमताचा आकडा नाही, परंतु आमचा अजित पवार यांच्यावर विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार अजित पवार यांच्यासोबत आले, तर आम्ही विश्वासदर्शक ठराव जिंकू, असे आठवले म्हणाले.

रामदास आठवले यांच्या वक्तव्याच्या काही मिनिटांनंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जावून फडणवीस यांची भेट घेतली आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अजित पवार यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राजीनामा देण्याची शक्यता आहे.