सोमय्यांच्या पीएचडीप्रकरणी संशयाचे ढग गडद, शिक्षणाची माहिती विद्यापीठाकडे नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई विद्यापीठातून मिळविलेल्या पीएच.डी.प्रकरणी संशयाचे ढग अधिकच गडद झाले आहेत. माहिती अधिकार कायद्यांतर्गत वारंवार मागणी करूनही याविषयी माहिती देण्यात टाळाटाळ करणाऱया मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाने कुलसचिवांकडे सादर केलेल्या पत्रात वाणिज्य विभागात सोमय्या यांची शिक्षणविषयक माहितीच उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. 6 ऑगस्ट रोजीचे हे पत्र असल्याचा दावा युवासेनेच्या वतीने करण्यात आला आहे, मात्र याप्रकरणी माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज करणाऱया किरण फाटक यांना विद्यापीठाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

किरीट सोमय्या यांना ज्या प्रबंधावर मुंबई विद्यापीठाने पदवी प्रदान केली तो प्रबंध विद्यापीठाच्या वाणिज्य विभागात असणे अपेक्षित होते. फाटक यांनी 31 मे रोजी माहिती अधिकारांतर्गत किरीट सोमय्या यांच्या शैक्षणिक वाटचालीसंबंधी तसेच त्यांनी मिळविलेल्या पीएच.डी. पदवीसंदर्भात उपलब्ध प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रांची माहिती मागविली होती, मात्र सदर माहिती देण्यात विद्यापीठ मागील सहा महिन्यांपासून टाळाटाळ करीत आहे, असा आरोप युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे, मिलिंद साटम, शीतल देवरुखकर-शेठ यांनी केला आहे.

दानवेंच्या पत्रालाही उत्तर नाही

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीदेखील मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र पाठवून मुंबई विद्यापीठाकडून किरीट सोमय्या यांच्या पीएच.डी. पदवीची कागदपत्रे मिळत नसल्याची तक्रार केली होती. 18 नोव्हेंबर रोजी दानवे यांनी हे पत्र दिले होते. विद्यापीठ प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून या पत्राची दखल घेत आवश्यक कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती, मात्र दानवे यांच्या पत्राला अद्याप विद्यापीठाकडून कोणताही प्रतिसाद विद्यापीठाने दिलेला नाही.