तिसरी लाट आणि हृदयाची काळजी

>> डॉ. बिपीनचंद्र भामरे

येत्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. पूर्वीपासूनच हृदयविकारांचा सामना करणाऱया व्यक्ती तसेच नव्याने हृदयविकाराचे निदान झालेल्या व्यक्तींना या काळात अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. वर्षभरापासून संपूर्ण देश कोरोना महामारीचा सामना करत आहे. अजूनही परिस्थिती सावरली नसून नुकतीच या संसर्गाची दुसरी लाट आली आणि आता काही महिन्यांमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या संक्रमण कालावधीत हृदयविकारग्रस्तांनी कशाप्रकारे खबरदारी घ्यावी या विषयीची माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. कोविड 19 चा संसर्ग हा केवळ आपल्या फुफ्फुसांवरच नव्हे तर हृदयावरदेखील परिणाम करतो. जेव्हा शरीर एखाद्या संसर्गाविरूद्ध लढत असते तेव्हा रोगप्रतिकारक शक्तीपासून ते हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित सर्व प्रणाली सुरळीतपणे कार्यरत असणे आवश्यक असते. बऱयाच कोविड रुग्णांना हृदयाची समस्या जसे की स्ट्रोक, छाती जड वाटणे आणि वेदना होणे, छातीत धडधडणे, हृदयविकाराचा झटका, मायोकार्डिटिस, सूज येणे, हृदयाची पंपिंग क्षमता कमी होणे, रक्त गोठणे आणि एरिथिमिया यासारख्या समस्या जाणवतात. अशा प्रकारच्या समस्या असलेल्यांनी हृदय निरोगी व मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलणे गरजेचे आहे.

आपल्या हदयाची काळजी घेण्यासाठी काय करू शकता?

z कोलेस्टेरॉलची पातळी तपासा ः आपल्याला माहीत आहे काय? कोलेस्टेरॉल हे हृदयविकाराच्या सामान्य कारणांपैकी एक आहे. म्हणूनच, आपल्या कोलेस्टेरॉलच्या पातळीवर नियमितपणे लक्ष ठेवणे खूप आवश्यक आहे. प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा तळलेले पदार्थ खाऊ नका.
z वेळापत्रक आखा ः आपल्याला वेळापत्रक दैनंदिन कामाचे वेळापत्रक आखावे लागेल. पुरेशी झोप आणि दररोज व्यायाम करण्यास विसरू नका. स्वतःसाठी काही वेळ काढण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रियजनांच्या संपर्कात राहा.
z घरच्या घरी व्यायाम करा ः आपणास हृदयविकाराचा त्रास असल्यास स्वतःच्या मर्जीने कसलेही व्यायाम प्रकार करू नका. शरीरातील रक्ताभिसरण वाढण्याकरिता घरातील मोकळ्या जागेत चालण्याचा व्यायाम करा. बराच वेळ एकाच ठिकाणी बसणे टाळा. अधून मधून स्ट्रेचिंग करा.
z संतुलित आहाराची निवड करा ः तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. आपल्या आहारात पोषक घटकांचा समावेश जसे की, अक्रोड, मासे, टोफू, ओट्स, सोयाबीन, अळशी, एव्हाकॅडो, बेरी, शेंगदाणे, गाजर, रताळे, शिमला मिरची, पालक, शतावरी, टोमॅटो, ब्रोकोली, संत्री, ओमेगा-3 फॅटी ऑसिड्सयुक्त पदार्थ खा. पपई. मसालेदार, तेलकट, खारट पदार्थ खाण्याचे टाळा. कार्बोनेटेड तसेच शर्करायुक्त पेय पिण्याचे टाळा. धूम्रपान किंवा मद्यपान करू नका. पुरेसे पाणी प्या आणि हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करा.
z वेळेवर औषधे घ्या ः औषधे घेण्यास टाळाटाळ करू नका. स्वतःच्या मर्जीने औषधोपचार करू नका.
z टेलिमेडिसिनची मदत घ्या ः व्हिडीओ कॉल किंवा टेलिफोनच्या माध्यमातून आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा. आपल्याला दम लागणे, छातीत धडधडणे किंवा दुखणे अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार घेण्यास अजिबात संकोच करू नका.
z कोविड प्रोटोकॉलचे अनुसरण करा ः मास्कचा वापर करा, सामाजिक अंतर राखा आणि वेळोवेळी हात धुण्यास विसरू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लसीकरण करा.
(लेखक सर एच. एन. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलचे कार्डियाक थोराँसिक सर्जन आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या