
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने साथरोग प्रतिबंधक कायदा केंद्रशासित राज्यांसह सर्वांनाच लागू केला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार उपाययोजना राबवित असले तरी नागरिकांचीही साथ महत्त्वाची आहे. नागरिकांनीही खबरदारीच्या उपायांचे तंतोतंत पालन करून कोरोनाचा बंदोबस्त करावा, असे आवाहन राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावं0त यांनी केले आहे.
डॉक्टर आणि रुग्णालयांची कमतरता तसेच नेमकी औषधे उपलब्ध नसल्याने प्लेग, कॉलरा, देवीसारख्या साथीच्या आजारांची तीव्रता कमी करण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा लागू केला होता. हा कायदा लागू केल्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णाच्या प्रवासावर, हालचालीवर नियंत्रण आणता येईल आणि संसर्गजन्य व्यक्तीला इतरांना संसर्ग देण्यापासून रोखता येईल. असे असले तरी या कायद्याने गर्दी खरोखरच रोखता येईल का, असा सवाल डॉ. दीपक सावंत यांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनीच आपल्या मानसिकतेत बदल करणे गरजेचे आहे. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहनही डॉ. सावंत यांनी केले आहे.
देवी, कॉलरा अशा संसर्गजन्य आजारांची जागा आता स्वाइन फ्लू, इबोला, कोरोनासारख्या आजारांनी घेतली आहे. त्यामुळे काळानुसार साथरोग प्रतिबंधक कायद्याच्या नियमावलीतदेखील बदल होणे गरजेचे असल्याचेही डॉ. सावंत म्हणाले.






























































