डॉ. तडवी प्रकरणाला प्रसारमाध्यमे, सरकारने जातीचा रंग देऊ नये!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाला प्रसारमाध्यमे आणि सरकारने जातीचा किंवा आरक्षणाचा रंग देऊ नये, अशी विनंती प्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉ. जे.जी. लालमलानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. मुळात वैद्यकीय शिक्षण घेताना विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण असतो. पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना विविध स्तरांतून जावे लागते. शस्त्रक्रियेदरम्यान एक लहानशी चूक डॉक्टरांच्या संपूर्ण टीमचे आयुष्य बरबाद करू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून जावे लागते. ही गोष्ट डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणात प्रकर्षाने ध्यानात घ्यायला हवी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. मुख्यमंत्रीसाहेब, आपल्याला यापुढे जाऊन विचार करायला हवा. मी स्वतः सायन रुग्णालयात कित्येक वर्षे काम केले आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान कोणत्या परिस्थितीतून जावे लागते हे मी पाहिले आहे, याकडेही डॉ. लालमलानी यांनी लक्ष वेधले आहे.

डॉ. लालमलानी यांचे सरकारला प्रश्न

  • संबंधित तीन वरिष्ठ डॉक्टरांना या ठिकाणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून सरकारने काय साध्य केले.
  • त्यांना पोलीस कोठडी देऊन काय साध्य करणार.
  • यातून इतर डॉक्टर काय धडा घेणार.
  • वैद्यकीय महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, अधिष्ठाता, प्रशासन यांची काही जबाबदारी आहे की नाही.
  • शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि त्यांच्या वरिष्ठांना दिवसाला 12 ते 15 तास तर आणीबाणीच्या परिस्थितीत 24 ते 36
    तास काम करावे लागते.
  • स्त्रीरोगतज्ञ विभागात तर प्रचंड काम असते. दिवसाला तब्बल 200 ते 250 रुग्णांना तपासावे लागते. 4 ते 5 सिझरीयन सेक्शन्समध्ये काम करावे लागते. 20 ते 25 प्रसूती कराव्या लागतात.