संधिवातासह जगताना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. प्रमोद भोर

शरीरातील एकापेक्षा जास्त सांध्यांना सूज येणं किंवा तीव्र वेदना होणं याला संधिवात असं म्हणतात. हा प्रामुख्याने वृद्धांना होणारा आजार आहे. वाढत्या वयासोबत हळूहळू वाढत जाणारा आजार मानला जातो. असं असलं तरी बदलत्या जीवनशैलीमुळे हल्ली लहान मुलं आणि युवकांनाही हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आर्थ्रायटिस वा संधीवाताचे शंभरपेक्षा जास्त प्रकार आहेत.

अॅन्कलुझिंग स्पॉन्डिलोसिस, ऑस्टिओ-आर्थ्रायटिस, रुमेटाईड आर्थ्रायटिस, लहान मुलांमध्ये आढळून येणारा इडिओपॅथिक आर्थ्रायटिस, रिअॅक्टिव्ह आर्थ्रायटिस, सेप्टिक आर्थ्रायटिस, गाऊट आणि पॉली आर्थ्रायटिस इत्यादी. संधिवात असलेल्या व्यक्तींनी वेदना कमी करण्यासाठी, कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि मानसिक त्रासातून दूर करण्यासाठी स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. या आजाराने ग्रासलेली एखादी व्यक्ती उदासीन, तणावग्रस्त, चिंताग्रस्त आणि निराश वाटू शकते. कारण तो/ती दैनंदिन कामे सहजतेने करू शकत नाही.

प्रमुख लक्षणं  

सांधेदुखी

सांध्यांमध्ये जाणवणारी ताठरता

सांध्यांना येणारी सूज

सांध्यांजवळील भाग लालसर होणं

चालण्या-फिरण्यात किंवा हालचाल करण्यात अडथळा येणे

सांधेदुखीच्या रुग्णांसाठी हे उपाय ठरतील फायदेशीर…

सक्रिय जीवनशैली: बराच वेळ एकाच ठिकाणी बसून राहणे टाळा. उदाहरणार्थ, जर तुम्ही डेस्कवर काम करत असाल तर दर 30 मिनिटांनी उभे राहून स्ट्रेचिंग करा. घरातही बसून न राहता शारीरिक हालचाल करा. व्यायाम करताना पुरेशी विश्रांती घ्या. मात्र कोणताही व्यायाम करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

छडी, वॉकर यांसारखी सहाय्यक उपकरणे वापरल्याने सांध्यांवरील ताण कमी होतो आणि संतुलन वाढू शकते.

संतुलित आहाराचे सेवन करा: या दीर्घकालीन स्थितीशी संबंधित जळजळ व्यवस्थापित करण्यात आणि वेदना कमी करण्यासाठी खाल्लेले अन्न महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आपल्या जेवणात विविध फळे आणि भाज्यांचा समावेश करणे. हे आपल्याला अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात जे आपल्या सांध्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात. सॅल्मन माशांमध्ये किंवा आढाsडमध्ये आढळणाऱ्या ओमेगा-3 फॅटी अॅसिडयुक्त पदार्थांचे आहारात सेवन करा.

संधिवाताची लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी निरोगी वजन राखणे महत्त्वाचे आहे. कारण जास्त वजन सांध्यावर ताण निर्माण करू शकते. सांध्यांच्या वंगणासाठी पुरेसे पाणी प्या आणि जंक फूड, हवाबंद डब्यातील पदार्थ आणि प्रािढया केलेल्या अन्नाचे सेवन टाळा.

न चुकता औषधोपचार करा : डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घेणे ही काळाची गरज आहे. स्वतच्या मर्जीने औषधोपचार करणे टाळा.

घरात लहानसे बदल करा: तुमच्या फर्निचरला लहान चाकं लावून घ्या, जेणेकरून तुम्ही ते सहजतेने हलवून तुमच्या घरातली स्वच्छता राखू शकता.

संधिवात असलेल्या अनेक रुग्णांसाठी ग्रॅब बार हा एक महत्त्वाचा तसेच सुरक्षिततेसाठी उत्तम उपाय ठरतो.

(लेखक फोर्टिस हॉस्पिटल, वाशीचे संचालक व ऑर्थोपेडिक्स आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत)