नियम पाळणे हेच कोरोना लढाईतील सर्वात मोठे हत्यार, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आगामी काही काळात कोरोना रूप बदलेल आणि लोकांनी घेतलेली लसदेखील उपयोगी ठरणार नाही. त्यामुळे कोरोना होऊ नये यासाठी आखून दिलेले नियम पाळणे हेच सर्वात मोठे कोरोनाविरोधातील हत्यार असल्याचे प्रतिप्रादन ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलोरिया यांनी रविवारी केले.

देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी एका खासगी वृत्तवाहिनीने डिजिटल आरोग्य संमेलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी ते म्हणाले की, लस हा कोविडवरील अंतिम उपाय नाही. लस एक हत्यार असून तिच्या माध्यमातून आपण कोरोनाविरोधात संरक्षण करू शकतो, पण लसपेक्षा सर्वात मोठे हत्यार म्हणजे कोरोनाच्या नियमावलीची काटेकोरपणे पालन करणे महत्त्वाचे आहे. लस घेतल्यावरदेखील कोरोनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे मत डॉ. रणदीप गुलेरिया यावेळी व्यक्त केले, तर लसीसंदर्भात जागरूकता निर्माण करणेदेखील गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी नमूद केले.

…तर दरवर्षी लस घेण्याची गरज

कोरोना विषाणू इतक्या मोठय़ा प्रमाणात पसरला असल्याने तो बराच काळ राहणार आहे. पण ज्यावेळी नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढेल त्यावेळी रुग्णसंख्या कमी होईल, अशी शक्यता त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यावेळी कोरोना ही सर्वसामान्य गोष्ट होईल. परंतु कोरोनाचा धोका सर्वाधिक असणाऱया वयोगटाला दरवर्षी कोरोनाची लस घेण्याची गरज पडू शकते, असे भाकीत डॉ. गुलेरिया यांनी वर्तविले.

…तेव्हा लॉकडाऊनची गरज भासणार नाही

कोरोनाची लस घेतली म्हणजे कोरोनाची लागण होत नाही असे नाही, तर कोरोना झालाच तर मृत्यू होण्याचा धोका कमी होत असल्याची माहिती डॉ. गुलेरिया यांनी दिली. तर लसीकरणामुळे आगामी काळात लॉकडाऊनसारखे निर्णय घ्यावे लागणार नाहीत. त्यावेळी संक्रमणावर आपल्याला नियत्रंण मिळविता येईल, असा अंदाजही त्यांनी यावेळी वर्तविला.