माझी उमेदवारी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

मी मतदानासाठी नाही तर व्यवसायाने डॉक्टर असल्याने तुमचा मुलगा म्हणून आरोग्य शिबीर घेत आहे. मी निवडून येईन अथवा न येईन आरोग्य सेवा चालूच ठेवणार आहे. आपल्या उमेदवारीबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जातात. अनेक कयास अंदाज बांधले जातात व वेळप्रसंगी त्याचा सोयीने अर्थ लावला जातो. परंतु अनेक वेळा आपण लोकसभेच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझी उमेदवारी ही सामान्यांची कष्टकऱ्यांची- युवकांची उमेदवारी असून या उमेदवारीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले.

तालुक्यातील कुसडगाव येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व येथील पहिला सौर ऊर्जा लोकार्पण व भूमी स्मशानभूमी व बंधारा इत्यादी कामाच्या भूमिपूजनप्रसंगी तसेच मोफत सर्व रोग निदान शिबीराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष जगन्नाथ राळेभात तर प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर राळेभात, दत्ता वारे, संजय वराट, प्रा. अरुण वराट, किसन ढवळे, सुधीर राळेभात, अमोल राळेभात, दिंगाबर चव्हाण, अमित जाधव, पवन राळेभात, भारत काकडे, अंकुश ढवळे, करण ढवळे, कैलास वराट, गजानन फुटाणे, मकरंद काशिद, हनुमंत वराट, पांडुरंग सोले आदी उपस्थित होते.

आमदार- खासदार हे सरकारी पैशातून निधी देतात परंतु त्यातही मोठ्या प्रमाणावर राजकारण करतात. मी मात्र माझी आरोग्य सेवेची समाजसेवा अविरत चालूच ठेवणार आहे. लोकसभेच्या माध्यमातून केंद्राचा भरभक्कम निधी मतदार संघात आणला गेला पाहिजे. त्यासाठी या प्रश्नांची पोट तिडकीने आपल्या मतदारसंघातील जनतेची व्यथा दिल्ली दरबारी मांडून, भांडून निधी आणणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. त्याहीपेक्षा राजकारणात समाजकारणात सुचिर्भुतपणा पाळणारा, नैतिकता जपणारा लोकप्रतिनिधी लोकांना हवा आहे. त्यामुळे 50 वर्षांपेक्षा जास्त समाजकारणात काम करणाऱ्या आमच्या कुटुंबावर आजपर्यंत एक रुपयाचाही गैरव्यवहाराचा आरोप नाही. याच नैतिकतेचा वापर करून आम्ही प्रशासनामार्फत लोकांची कामे करू शकतो. त्यामुळे या पुण्याईच्या जोरावर लोकांच्या आशीर्वादावर व समाजाच्या पाठबळावर आपण लोकसभेची उमेदवारी करणार आहोत. आपली भूमिका येणाऱ्या काळात लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत, असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.