धावत्या लोकलच्या फुटबोर्ड व फलाटामध्ये अडकलेल्या प्रवाशाला मिळाले जीवदान, जवानांनी प्रसंगावधान राखत केली मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी रेल्वे स्थानकात एक थरारक घटना घडली. प्रवाशांनी गच्च भरलेल्या विरार लोकलमध्ये घुसण्याचा एका प्रवाशाने प्रयत्न केला. ते फुटबोर्डवर चढले आणि लोकल सुरू झाली. पण स्वतःला सावरता न आल्याने त्या प्रवाशाचा पाय सटकला आणि ते फुटबोर्ड आणि फलाटाच्या मध्ये सापडले. त्याच परिस्थितीत ते लोकलसह फरफटत जाऊ लागले. सुदैवाने फलाटावर तैनात महाराष्ट्र सुरक्षा बल जवानांनी त्यांना पकडून बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला.

अंधेरी रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 8/9 वर विरार लोकल आली. लोकल प्रवाशांनी खच्चून भरलेली होती. एका प्रवाशाने आत घुसण्याचा प्रयत्न केला आणि ते फुटबोर्डवर उभे राहिले. तेवढय़ात लोकल सुरू झाली आणि त्या प्रवाशाचा तोल गेला आणि ते फलाट आणि लोकलच्या मध्ये सापडले. तेवढय़ात गस्त घालत असलेले मसुब जवान मोरे व गुट्टे यांनी पुढे जात त्याला सुखरूप बाजूला केले. त्यामुळे प्रवाशाचे प्राण वाचले.