
राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱयांना आता कार्यालयात जीन्स वापरण्यास मुभा देण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. मात्र टी शर्ट वापरण्यास मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे खासकरून तरुण अधिकारी व कर्मचाऱयांमध्ये आनंदाची भावना निर्माण झाली आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये अनेक अधिकारी-कर्मचारी कामावर टी शर्ट-जीन्स अशा कॅज्युअल पेहरावात येत असल्याचे आढळून आले होते. कर्मचाऱयांच्या वेशभूषेचे प्रतिबिंब कर्मचाऱयांच्या व्यक्तिमत्त्वात व विभागाच्या कामावर उमटते. त्यामुळे मंत्रालयातील कर्मचाऱयांसाठी मागील वर्षीच्या डिसेंबरमध्ये ड्रेस कोड लागू केला होता.
दर शुक्रवारी खादीचा डेस परिधान करावा
कार्यालयात जीन्स व टी शर्टवर बंदी घातली होती. पण यावर कर्मचारी संघटना खासकरून तरुण अधिकारी व कर्मचाऱयांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे ड्रेस कोडमध्ये सुधारणा करण्याची मागणी पुढे येऊ लागली होती. त्यानुसार राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आज नव्याने परिपत्रक जारी करून कार्यालयात टी शर्टचा वापर करू नये असे आदेश जारी केले आहेत. शुक्रवारी खादीचा ड्रेस परिधान करावा असेही आदेशात म्हटले आहे.
































































