
सामना प्रतिनिधी । मुंबई
दुबईहून मुंबईत आणलेला 110 किलो सोन्याचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) डोंगरी आणि झवेरी बाजारात पकडला. या धडक कारवाईत डीआरआयच्या पथकांनी तब्बल 35 कोटी रुपये किमतीच्या सोन्याच्या साठय़ासह दोन कोटींची रोकड हस्तगत केली आणि सात तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
काही तस्करांनी सोन्याचा साठा गुजरातवरून मुंबईत आणला असल्याची खबर डीआरआयला मिळाली होती, त्यानुसार डीआरआयचे उपायुक्त समीर वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीआरआयच्या पथकांनी गुरुवार आणि आज डोंगरी व झवेरी बाजारात छापेमारी केली. यावेळी सात तस्कर त्यांच्या हाती लागले आणि त्यांनी बेकायदेशीर आणलेला सोन्याचा साठा व कोटय़वधींची रोकड सापडली. 35 कोटींचे सोने व दोन कोटींची रोकड असा तब्बल 37 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या धडक कारवाईमुळे सोने व्यापारी व सोन्याची तस्करी करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत. त्या सात जणांमध्ये दुबईहून सोन्याचा साठा आणणाऱया प्रमुख तस्करांचादेखील समावेश आहे. तो दुबईतला राहणारा असून एनआरआय आहे.
दुबई व्हाया गुजरातमार्गे मुंबईत
तस्करांनी समुद्रामार्गे हा सोन्याचा साठा गुजरातमध्ये आणला होता. तेथील मुद्रा बंदरावर पितळ असल्याचे सांगून आणलेला सोन्याचा कंटेनर क्लिअर करून घेतला. त्यानंतर तो कंटेनर रस्त्याने मुंबईत आणला होता अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. सोन्याची तस्करी करणारे फार मोठे रॅकेट असून त्यात कोणाकोणाचे हात गुंतलेले आहेत त्याचा आता तपास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पितळेच्या नावाखाली सोन्याची तस्करी
जप्त केलेला सोन्याचा साठा पितळेच्या नावाखाली हिंदुस्थानात आणण्यात आला होता. दुबईहून निघालेल्या कंटेनरमध्ये पितळ असल्याचे सांगण्यात आले होते, पण पितळेच्या नावाखाली कंटेनरमध्ये सोने ठेवून ते गुपचूप गुजरात मग तेथून मुंबईत आणण्यात आले असे त्या अधिकाऱयाने सांगून यापूर्वीदेखील अशी तस्करी झाली होती का, ते आता तपासण्यात येणार आहे.



























































